पुणे : ‘मधुमेह’ ही एक जागतिक आरोग्य समस्या बनली असून, आज भारतात साडेसहा कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. पुण्यात ही संख्या दहा लाखांच्या आसपास आहे. टाईप १ प्रकारचा मधुमेह संपूर्ण बरा करणे अवघड असले तरी टाईप २ पद्धतीच्या मधुमेहाला संतुलित आहार, दैनंदिन व्यायाम अणि ध्यानधारणा यांबरोबरच हिरव्या स्मूदीच्या सेवनानेही दूर ठेवता येणे शक्य आहे. अतिरिक्त चरबी, शरीरातील वाढलेली आम्लता आणि पोषक द्रव्यांचा अभाव या तीन महत्त्वाच्या कारणांवर स्मूदीने मात करता येऊ शकते असा दावा ‘फ्रीडम फ्रॉम डायबेटिस’ चे संस्थापक डॉ. प्रमोद त्रिपाठी यांनी केला आहे.आज ‘मधुमेहाची राजधानी’ अशी भारताची निर्माण होणारी ओळख चिंताजनक आहे. २०३० पर्यंत देशातील दहा हजार कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त होणार आहेत. ही धोक्याची घंटा लक्षात घेता मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. उद्या (मंगळवारी) जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉ. त्रिपाठी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता फ्रीडम फ्रॉम डायबेटिस या चळवळीची माहिती देत त्यांनी ‘हिरवी स्मूदी’ च्या सेवनाने मधुमेहींना होणार्या फायद्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, हिरवी स्मूदी हे एक नैसर्गिक पेय आहे. यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे आणि काही विशिष्ट मसाले आहेत. सध्याच्या आहारात आपण हरित द्रव्य पुरेशा प्रमाणात घेत नाही. हे द्रव्य बरेच आजार बरे करू शकते. ज्यावेळी आपण पालेभाज्या शिजवतो तेव्हा त्यातील हरित द्रव्य नष्ट होते. यासाठी हिरव्या स्मूदीचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कमरेचा घेरा हा मोजकाच पाहिजे. हा घेरा ३३ इंचापेक्षा बाहेर गेला तर धोक्याची घंटा वाजली पाहिजे. या हिरव्या स्मूदीच्या सेवनाने आमच्याकडील २००हून अधिक रूग्ण असे आहेत ज्यांचे २० किलोहून अधिक वजन कमी झाले आहे तर शेकडो रूग्णांचे वजन हे दहा ते वीस किलो कमी झाले आहे. तसेच जुनाट आम्लपित्त आणि सांधेदुखीही कमी झाली आहे. हृदयरोगामध्ये रक्तवाहिन्यात आम्लता व सूज वाढल्यानंतर चरबी जमा होऊन हृदयविकाराचा झटका येतो. ही आरोग्यदायी हिरवी संजीवनी (स्मूदी) या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे.
स्मूदी पाककृती१ कोणतीही एक हिरवी पालेभाजी उदा : पालक (५ ते ६ पाने) किंवा आंबट चुका (१० ते १५ पाने) किंवा चाकवत किंवा राजगिरा/अंबाडी हे सर्व व्यवस्थित धुऊन मिक्सरमध्ये टाकावे.२ त्यात पुदिना (२० ते २५ पाने) व विड्याचे पान (१) सुरुवातीला हेच दोन टाकावे. एका आठवड्यानंतर तुळस, कढीपत्ता, कोथिंबीर आलटून पालटून चवीनुसार टाकावे.३ एक फळ टाकावे. जर उपाशीपोटीची साखर ११० पेक्षा जास्त असेल तर सफरचंद किंवा पेर याचा वापर करावा. जर उपाशीपोटीची साखर ११० पेक्षा कमी असेल तर किंवा मधुमेही नसाल तर केळ किंवा चिक्कू वापरावा.४ चिमूटभर दालचिनी व काळी मिरी, अर्धा चमचा सैंधव मीठ व अर्धा लिंबाचा रस घालावा. ५ एक ग्लास पाणी६ मिक्सरमध्ये तीन मिनिट फिरवावे. ७ न गाळता ही हिरवी स्मूदी एकेक घोट सावकाश प्यावी.८ कमीतकमी १ ग्लास (२५० मिली) सकाळी उठल्यावर अर्धा/एक तासाच्या आत उपाशीपोटी घ्यावी. हे प्रमाण वाढवून नंतर २ ग्लास करावे.
आनंदमय जीवनासाठी चळवळ फ्रीडम फ्रॉम डायबेटिस ही एक चळवळ असून, भारत व जगभरातील मधुमेहींना इन्शुलिन व औषधांमधून मुक्ती मिळावी व त्यांनी आनंदाने जीवन जगावे हा चळवळीचा उद्देश आहे. संतुलित आहार, दैनंदिन व्यायाम अणि ध्यानधारणा यामधून जवळपास ५ हजारांहून अधिक लोकांची मधुमेहासाठीच्या औषध, तर हजार लोकांची इन्शुलिनपासून मुक्तता झाली तसेच मधुमेहामुळे जे लोक फार वेळ उभे राहू शकत नाही त्यांच्यासाठी ‘खुर्चीवरील सूर्यनमस्कार’ ही व्यायामाची नवी पद्धत विकसित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मधुमेहाची कारणे ४ चरबी वाढणे४ सूज वाढणे४ चहा, बिस्किट, मैद्याचे अतिसेवन४ पोषक द्रव्यांचा अभाव४ स्थगित लसिका४ मानसिक ताण-तणाव४ व्यायामाची कमतरता