पुणे : आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते, अपमान सहन करावे लागतात; मात्र दु:खातूनच मोठेपण मिळते. त्यामुळे अपमानाच्या घटनांकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहा आणि जिद्दीने नाव कमवा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी दिला.लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर या बहिणींना नृत्यक्षेत्रातील कार्याबद्दल संगीत कला अकादमीतर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची कोथरूड शाखा आणि वेधवंती या संस्थेच्या वतीने त्यांचा गुरुवारी गांधी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, वेधवंती संस्थेचे निर्माते शशिकांत कोठावळे उपस्थित होते.छाया खुटेगावकर म्हणाल्या, ‘‘यश मिळवायचे असेल, तर कष्ट आणि मेहनतीला पर्याय नाही. मी शालेय शिक्षण पूर्ण करू शकले नाही. मात्र, ६ वर्षे कथकचे आणि नंतर लावणीचे प्रशिक्षण घेतले. लावण्यांच्या कार्यक्रमांनी कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. अनेक ठिकाणी अपमानालाही सामोरे जावे लागले. मात्र, सर्व अपमान पचवून कलेशी इमान राखण्याचा नेहमी प्रयत्न केला. कारण, कलेची जोपासना हाच माझा ध्यास होता. आजही तरुणींना नृत्याचे प्रशिक्षण देताना त्यात नावीन्य आणण्याचा माझा प्रयत्न असतो. नव्या पिढीने नृत्यातील बारकाव्यांचा अभ्यास करून कला जोपासली पाहिजे. घुंगरांचा ताल, लय आणि अभिनय यांतूनच लावणी परिपूर्ण होऊ शकते.’’ (प्रतिनिधी)
संकटांवर मात करीत पुढे चला
By admin | Published: October 14, 2016 4:43 AM