शिक्रापूर - पाबळ (ता. शिरूर) येथील लोणी रोडवरील थापेवाडी येथे मंगळवारी (दि. ६) सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान टेम्पो उलटून आठ जण गंभीर जखमी झाले, तर इतर सात जणांना मार लागला आहे. ग्रामस्थांनी सर्व जखमींना पाबळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालय, तसेच व मंचर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील विठ्ठलकृपा कलानाट्य भजनी व भारुड मंडळाचे १५ सदस्य वाघोली येथील भावडी येथे त्यांच्या (एमएच १६ ४५६४) टेम्पोतून जात होते. पाबळ येथील थापेवाडीजवळ अचानक टेम्पो उलटला आणि पंधरा जण जखमी झाले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु टेम्पोतील पाच ते आठ व्यक्तींना गंभीर इजा झाली असून इतरांना किरकोळ इजा झाल्याची माहिती पाबळ येथील डॉ. जयसिंग बोºहाडे यांनी दिली आहे.या घटनेत दादाभाऊ टाव्हरे, मंगेश काकडे, अविनाश पवार, महेश काकडे, नारायण काकडे, विक्रम जाधव, शिवाजी पाचर्णे, भिकाजी वारे, दिलीप वणवे, नवनाथ काळे, बाळासाहेब वणवे, नवनाथ काकडे जखमी झाले असून इतरांची नावे समजू शकली नाहीत.या घटनेचे वृत्त कळताच थापेवाडी, पाबळ येथील नागरिकांबरोबरच जारकरवाडीच्या सरपंच रुपाली भोजने, ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजने, उपसरपंच बाळासाहेब ढोबळे, ग्रामीण उपकेंद्र आरोग्याधिकारी डॉ. भूषण बढेकर, माजी उपसरपंच सचिन टाव्हरे, चेअरमन जगन्नाथ भोजने, भाऊ गवते, राजेंद्र शिंदे, बाबाभाई इनामदार यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करीत पुढील उपचारासाठी व्यवस्था केली. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे-पाटील, माजी संचालक विलास लबडे, पंढरीनाथ काकडे यांनी विशेष प्रयत्न केले.
पाबळला टेम्पो उलटला; आठ जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:58 AM