पुणे : तिकीट खिडकीवरील रांग कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘आॅटोमेटेड टिकिट वेंडिंग मशिन’ (एटीव्हीएम) बाबत प्रशासनामध्येच उदासीनता आहे. तसेच याबाबतची माहिती मिळत नसल्याने प्रवाशांमध्येही ‘एटीव्हीएम’बाबत उदासीनता जाणवत आहे. पुणे स्थानकातून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा होत असताना, आवश्यक असलेल्या १ ते २ स्मार्ट कार्डचीच आठवडाभरात विक्री होत आहे.मध्य रेल्वेने मागील वर्षी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार स्मार्ट कार्ड घेतलेल्या प्रवाशांना ‘एटीव्हीएम’द्वारे देशातील कोणत्याही गाडीने प्रवासासाठी तिकीट लगेच मिळू शकते. त्यासाठी रांगेत उभे राहण्याचीही आवश्यकता नाही. पुणे रेल्वे स्थानकावर सध्या अशा सात मशिन आहेत. या योजनेंतर्गत बहुतेक मशिन रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी चालवीत आहेत. स्मार्ट कार्ड योजना दिल्ली मेट्रोमध्ये प्री-पेड कार्ड सारखी आहे. मेट्रो प्रवाशांना याचा खूप फायदा होत आहे. मुंबईतील लोकल प्रवाशांनाही या योजनेने मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक प्रवासी स्मार्ट कार्डद्वारे कमी वेळेत तिकीट मिळवितात. पुणे रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएमबाबत मात्र चित्र उलटे आहे. अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्डबाबत माहितीही नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांमध्येही जागरूकता नाही. पुणे स्टेशनवरील तिकीट खिडकी क्रमांक पाचवर स्मार्ट कार्डची माहिती मिळते. तेथील कर्मचाऱ्याला विचारले असता त्याने ही सुविधा केवळ तेथील कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे सांगितले. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, ‘‘तिकीट खिडकीवरील गर्दीत न जाता प्रवाशांना स्मार्ट कार्डचा आधार घ्यायला हवा. तिकीट खिडकीला हा खूप चांगला पर्याय आहे. रेल्वे प्रशासन ही योजना प्रवाशांपर्यंत पोहचविण्यास असमर्थ ठरत आहे.’’ (प्रतिनिधी)पुणे रेल्वे स्थानक परिसरात विविध ठिकाणी या योजनेची माहिती फलकांवर लावण्यात आली आहे. पण प्रवाशी स्वत:च स्मार्ट कार्ड घेऊ इच्छित नाहीत. आम्हाला आठवड्यातून केवळ १ किंवा २ कार्डांचीच विक्री करावी लागत आहे. प्रवाशांना कार्ड नाकारण्याचा प्रश्नच येत नाही.- बी. के. पांडे, बुकिंग अधीक्षक
‘एटीव्हीएम’बाबत रेल्वेसह प्रवासी उदासीन
By admin | Published: April 19, 2015 12:59 AM