सातारा : पुणे - बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. टँकर उलटल्यानंतर पेट्रोल रस्त्याच्या कडेने वाहत असल्याने आग लागल्याची मोठी शक्यता होती. या घटनेनंतर तिथे काही वेळ बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परंतु पोलीस व अग्निशामक दल यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रणात आली.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडली. त्या वेळी या टॅकरमधील पेट्रोल रस्त्यावर पाण्यासारखे वाहताना दिसत होते. त्यामुळे काही अघटीत घडले तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. रस्ताजवळील सोसायट्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी नांदेड सिटी अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख सुजित पाटील यांनी सर्व परिस्थिती संभाळत चार क्रेन आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या मागवल्या होत्या. त्यामुळे वाहणारे पेट्रोल रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे करीत इंधन जमिनीमध्ये जिरवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच वाहणाऱ्या पेट्रोलवर माती टाकुन घसरडे रस्ते व्यवस्थित केले. वाहणाऱ्या इंधनावर फोरमचा फवाऱ्यांचा वापर केला. त्यामुळे कोठे ठिणगी पडली तर आग पसरणार नाही यांची पुरेपूर काळजी अग्निशामक दल घेत होते.
खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजही काही काळाकरिता बंद केली होती. टँकर उलटल्याने महामार्गावर काही काळाकरिता वाहतूक थांबविण्यात आल्याने वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ननवरे, बिट मार्शल महेंद्र राऊत, सुशांत यादव तसेच अग्निशामक दलाचे ओंकार इंगवले, भूषण देशमुख, अभिषेक गोणे, प्रसाद जिवडे, महेश गारमाळ, शरद माने ओंकार पाटील, महेंद्र देशमुख, अभिजित रांजणे, तेजस डांगरे आदी कर्मचाऱ्यांनी तसेच नऱ्हे येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कुटे यांनी जीव धोक्यात घालून उलटलेला टँकर सरळ करून वाहतूक सुरळीत केली.
पलटी झालेला रिलायन्स कंपनीचा टँकर हा मुंबईकडून जयसिंगपूरकडे निघाला होता. पहाटेच्या सुमारास घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचून त्यांनी जीव धोक्यात घालून पलटी टँकर क्रेनच्या साहाय्याने सरळ केला. मात्र रिलायन्स कंपनीच्या रेस्क्यू टीमला पहाटे कळवूनही ते सकाळी आठ वाजता घटनास्थळी पोहचल्याने टँकर वाहतुकीसाठी योग्य असल्याचे सर्टिफिकेट मिळण्यास विलंब झाल्याने महामार्गावर इतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.