पुणे : कोरोनाबाधित रुग्ण, मधुमेही व्यक्ती तसेच इतर रुग्णांमध्ये स्टेरॉइड्सचा वापर वाढला आहे. विशेषतः, कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारांमध्ये स्टेरॉइड्सचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. यामुळे रक्तशर्करेची पातळी वाढते. रुग्णांमधील सायटोकाईन स्टॉर्म रोखण्यासाठीही स्टेरॉइड्स वापरली जातात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण होते आणि म्युकरमायकोसिससारख्या आजारांना आमंत्रण मिळते, असा इशारा वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाकाळात काळी बुरशी अर्थात म्युकरमायकोसिस, सायटोमेगॅलो व्हायरस अशा काही संसर्गाची नावे नव्याने समोर येत आहेत. पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होते आणि कोरोनाच्या काळात आणखी नवे विषाणू आपल्यासमोर नवीन संकटे निर्माण करणार का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. याबाबत विषाणूतज्ज्ञांशी संपर्क साधून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, रोगप्रतिकारकशक्ती हा कळीचा मुद्दा असल्याचे मत समोर आले आहे.
आपल्या आजूबाजूला हवेत लाखो विषाणू असतात. शरीराची प्रतिकारकशक्ती कमी झाली की विषाणू शरीरावर हल्ला करतात. कोरोनाच्या विषाणूने रोगप्रतिकारशक्तीवर केलेला हल्ला आणि उपचारांदरम्यान करण्यात येणारा स्टेरॉइड्सचा अतिवापर यामुळे नव्या विषाणूंशी संबंधित आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे कोणत्याही साथीच्या रोगात आपली प्रतिकारशक्ती हेच शस्त्र आहे, याकडे जैवशास्त्रज्ञांनी लक्ष वेधले आहे.
---
म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. म्युकामायकोसिस झालेल्या व्यक्तीच्या श्वासातून किंवा थुंकीवाटे तो इतर व्यक्तींना होत नाही. मात्र, या आजाराचे राज्यातील रुग्ण वाढत आहेत. केंद्र सरकारने यास अधिसूचित आजार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे रुग्णालयांनीही त्याची नोंद घ्यायला हवी.
- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना टास्क फोर्स
----
कोरोनाकाळात स्टेरॉइड्सचा वापर अवाजवी प्रमाणात करण्यात येत आहे. टास्क फोर्सनेही स्टेरॉइड्सचा जपून वापर करा, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, रुग्ण लवकर बरे व्हावेत, वेगाने प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांकडून अमर्यादित वापर होऊ लागला. त्यामुळे कोरोनापश्चात संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. स्टेरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाली की विषाणू शरीरावर हल्ला करतात. अमेरिका, युकेमध्ये म्युकर मायकोसिसचे प्रमाण नगण्य आहे. भारतात मात्र रुग्णांची संख्या वाढते आहे. स्टेरॉईडसचा वारेमाप वापर कमी झाल्यास पोस्ट कोव्हीड इन्फेक्शनमध्येही घट होईल. दिल्लीत २ डीऑक्सी डी ग्लुकोज या औषधाचा वापर सुरू करण्यात आला आहे. साधारणपणे १ जूनपासून सर्वत्र औषधाचा वापर सुरू होईल. यामुळे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होऊ शकेल. स्टेरॉइडसचा वापरही कमी होईल.
- डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
----
कोरोना रुग्णांमध्ये इतर संसर्गाचा प्रभाव जास्त आढळून येतो. आपण दुबळे झालो तर शत्रू आपल्यावर हल्ला करतो. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली की विषाणूंचा हल्ला होतो.
- डॉ. मिलिंद वाटवे, जैवशास्त्रज्ञ