पुणे : चालकाला मद्यप्राशन करण्याचे व्यसन आहे हे माहिती असूनही डम्पर चालवायला दिल्यामुळे वाघोली पोलिसांनी डम्पर मालकाला अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री मद्यधुंद डम्पर चालकाने नऊ जणांना चिरडल्यानंतर पुण्यात खळबळ उडाली. यात तीन जणांचा मृत्यू, तर सहा जण गंभीर जखमी झाले. राेजगारासाठी अमरावतीवरून आलेल्या या कामगारांची स्थिती खूपच हालाखीची आहे. त्यांना परत जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यांना मिनी बस करून अमरावती येथे रवाना करण्यात आले, तर रात्री उशिरा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन बाळांसह तरुणाला अमरावती येथे नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनिल काटे असे अटक करण्यात आलेल्या डम्पर मालकाचे नाव आहे. पोलिसांनी काटे याला वाघोली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलवले होते. तपासात अनिल काटे याला डम्पर चालकाला दारू पिण्याचे व्यसन होते, हे माहिती होते. जेव्हा डम्पर चालक डम्पर घेऊन चालला होता, तेव्हा काटे याला याबाबत माहिती होते, तसेच चालकाने डम्परमधील माल आव्हाळवाडी येथे उतरवला होता. तपासात काटे याने चालकाने डम्पर घेऊन जाताना दारू प्यायला होता का नव्हता, याबद्दल माहिती नसल्याचेही सांगितले. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मालकाने मद्यपी डम्पर चालकाला गाडी चालविण्यासाठी द्यायला नको होते, तसेच त्याला नोकरीवर ठेवताना गाडी चालविताना मद्यप्राशन करून गाडी चालवायचे नाही, असेही कामावर ठेवण्यापूर्वी वारंवार सांगणे अपेक्षित होते. त्यामुळे या प्रकरणी डम्पर मालकाला अटक करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.