पुणे : महापालिकेच्या वतीने चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. आतापर्यंत ९० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून, यामध्ये सुमारे दीड एकरचे सहा-सात मालकच मोबदला घेण्यासाठी पुढे आलेले नाही. महापालिकेच्यावतीने याबाबत जाहीर निवदेन, नोटिसा देऊनदेखील जागेचे मालक सापडत नसल्याने अखेर ही जागा एकतर्फीच ताब्यात घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चाच असलेल्या चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, राष्ट्रीय महामार्गाकडे जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्यावतीने जागेची मोजणी केली असता उड्डाणपुलासाठी १३.९६ हेक्टरऐवजी केवळ ११.५० हेक्टरच जागा लागत असल्याचे सांगितले. यामुळे आता भूसंपादनाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असल्याचे उगले यांनी स्पष्ट केले. यामध्ये जाहीर निवेदन देऊन, संबंधित नागरिकांना नोटिसा देऊन जागेचा मोबदला घेण्यासाठी बोलाविण्यात आले. परंतु यामध्ये सुमारे दीड एकर जागेचे सहा-सात सातबारे असलेले एकही व्यक्ती समोर आलेली नाही. त्यामुळे अखेर ही जागा एकतर्फेच ताब्यात घेण्याचा निर्णय ंमहापालिका प्रशासनाने घेतला आहे. भविष्यात यापैकी कोणी आल्यास त्यांना त्याचा मोबदला देण्यात येईल, असेदेखील उगले यांनी सांगितले. त्यामुळे आता भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरू करण्याची प्रतीक्षा आहे. चांदणी चौकातील हा बहुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास चांदणी चौक परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सध्या बावधन कोथरुड येथील चांदणी चौक येथून राष्ट्रीय महामार्ग ४ जात असून या चौकातून मुंबई, सातारा, कोकण, पुणे शहर या भागामध्ये वाहतूक होत असते. चांदणी चौक येथे वेगवेगळे पाच रस्ते मिळतात. भौगोलिक परिस्थितीनुसार येथे वारंवार प्रचंड वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी चांदणी चौक येथे बहुमजली उड्डाणपुलाचा उपयोग होणार आहे.