पुणे – केंदाने मांडलेला अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे. आत्मनिर्भर हा शब्द नागरिकांच्या इतका पसंतीला आला की ऑक्सफोर्ड डिक्शनरीला त्याची नोंद घ्यावी लागली. त्यामुळे हा एक गौरव आहे अशा शब्दात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केले आहे.
याबाबत प्रकाश जावडेकर म्हणाले की, कोरोनामुळं उद्भवलेल्या परिस्थितीकडे पाहून यंदा कर्ज वाढ नसलेला हा अर्थसंकल्प सादर झाला. शेतकरी आणि गरिबांचं कल्याण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. एकलव्य निवासी विद्यालय उभारणार आहोत, महिलांचे सक्षमीकरण करणारा, प्रवाशी मजुरांसाठी रेशनची सुविधा देणारा हा अर्थसंकल्प आहे, तसेच 2 लाख 37 हजार कोटी कोरोनासाठी, तर 35 हजार कोटी कोरोना लसीकरणासाठी तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी किती मदत याची माहिती घेतो
महाराष्ट्राला नेमका किती निधी दिला हे मी अर्थ खात्या कडून माहिती घेऊन देतो. प्रश्न महाराष्ट्राचा नाही. प्रत्येक राज्याचा असतो, तसा विचार करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. सामान्य लोकांचा, समाजातील प्रत्येक क्षेत्राला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे असं प्रकाश जावडेकरांनी सांगितले.
त्याचसोबत आंतरराष्ट्रीय बाजारातील दर लवकरच कमी होतील अशी अपेक्षा आहे. तेंव्हा पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात येतील असा विश्वास जावडेकरांनी व्यक्त केला.