लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ऑक्सिजन ऑडिटसाठी आमची समिती काम करतेच, पण कोणी खासगी संस्थेकडून तेच काम परत करून घेत असेल तर चांगलेच आहे, कारण ऑक्सिजनची बचत होणे महत्त्वाचे आहे, असे राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. राज्य सरकारने मध्यंतरीच्या ऑक्सिजन कमतरतेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच रुग्णालयांचे ऑडिट सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.
आजमितीस समितीच्या पोर्टलवर ४१०० रुग्णालये असून त्यांच्या ऑक्सिजन, स्ट्रक्चरल व फायर ऑडिटचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे अशी माहिती त्यांनी दिली. या तपासण्यांमधून संबंधित रुग्णालये सुरक्षित तर झालीच आहेत, शिवाय ऑक्सिजनची नियमित बचतही सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. नारनवरे ऑक्सिजनबाबत नियोजनाचे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी तज्ज्ञांचा समावेश करून समित्या कार्यरत केल्या आहेत. या समित्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांचे राज्य समितीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वरील तिन्ही प्रकारांचे ऑडिट करतात.
तरीही काही खासगी रुग्णालये खासगी संस्थांकडून याच पद्धतीचे ऑडिट करत असून त्यांच्याकडूनही अनेक रुग्णालयात ऑक्सिजन गळती व सिलिंडरमधील तांत्रिक दोष सापडत आहेत. याविषयी विचारले असता डॉ. नारनवरे यांनी समितीच्या तपासणीनंतरही असे दोष सापडत असतील तर त्यात कालावधीची तफावत असेल, असे सांगितले. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा तपासणी केली तर वितरणात किंवा सिलिंडरचे व्हॉल्व्ह वगैरेत काही दोष सापडणे शक्य आहे, मात्र खासगी रुग्णालये अशी नियमित तपासणी करून घेत असतील तर ते चांगलेच आहे असे ते म्हणाले.