भिगवण: कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. शासनाकडून विविध उपययोजना राबविण्यात येत असून, त्याची तालुक्यात कडक अंमलबजावणी करावी. तसेच भिगवणमधील कोविड सेंटरमध्ये मंगळवारपासून ५० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भिगवण ट्रामा केअर सेंटरमध्ये इंदापूर तालुक्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे, जि. प. सदस्य हनुमंत बंडगर, गट विकास अधिकारी विजय परीट, तालुका आरोग्य अधिकारी सुनील गावडे, भिगवण कोविड सेंटरचे प्रमुख कैलास व्यवहारे उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, इंदापूर, वालचंदनगर आणि भिगवण हद्दीत ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावावे. संचारबंदीची काटेकारेपणे पालन करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. भिगवण कोविड सेंटरमध्ये मंगळवारपासून ५० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू कण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.
या वेळी भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे, माजी सरपंच पराग जाधव आणि पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,सचिन बोगावत ,तुषार क्षीरसागर यांनी तपासण्या वाढविण्यावर आणि भिगवण परिसरातील कोविड सेंटर मध्ये इंजेक्शन पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी केली.बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता आर.एल.चौधरी स्थापत्य अभियंता ए.ए.कावडे ,इंदापूर तालुका पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे ,वालचंदनगर स.पो.नि दिलीप पवार ,भिगवण स.पो.नि. जीवन माने तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
१७ भिगवण