लोकमत exclusive: कल्याणराव आवताडे
धायरी: एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नसताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधा असलेले २० बेड मात्र धूळ खात पडले आहेत.
पुण्यात महापालिका व खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची कमतरता असतानाच अत्यवस्थ रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. गंभीर रुग्णांसाठी खबरदारी म्हणून पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याचे प्रशासन सांगत असले तरी लायगुडे रुग्णालयात मात्र 'स्टाफ' नसल्याने २० बेड धूळ खात पडून आहेत. सिंहगड रस्त्यावरील वडगांव खुर्द येथील महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयात ऑक्टोंबर महिन्यात ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले. ५० बेडची क्षमता असताना डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदी ' स्टाफ ' कमी असल्याने फक्त ३० बेड सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासन खासगी रुग्णालयातील ५० टक्के बेड ताब्यात घेण्याची तयारी करत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या रुग्णालयात सर्व सोयी - सुविधा असताना फक्त मनुष्यबळाच्या अभावी २० बेड वापराविना पडून आहेत. ऑक्टोबर महिन्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यावेळी बोलताना महापौरांनी लायगुडे रुग्णालयात एकूण ५० बेड टप्प्याटप्प्याने सुरू होतील असे सांगितले होते. परंतु आत्तापर्यंत फक्त ३० ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले आहेत. सध्या लायगुडे दवाखान्यात ओपीडी, स्वॅब सेंटर, लसीकरण केंद्र, आदी प्रकारच्या सेवा सुरु आहे.
-------------
दररोज फक्त ५० जणांचीच ' स्वॅब टेस्ट '...
महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयात दर दिवशी फक्त ५० संशयितांची स्वॅब टेस्ट केली जात आहे.
सिंहगड रस्ता परिसरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेच्या रुग्णालयात मात्र आमच्याकडे रोज फक्त पन्नासच चाचणी किट येत असल्याचे सांगून नागरिकांना परत पाठविले जात आहे. यावरून नागरिक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांत दररोज वाद होताना दिसून येत आहे.
--------------------
लायगुडे हॉस्पिटलमध्ये असलेली ऑक्सिजन बेड्च एकूण क्षमता ५० ची असून त्यापैकी ३० बेड्स सध्या कार्यान्वित आहेत, तर उर्वरित बेड लवकरच सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जेवढे लोक स्वॅब टेस्टसाठी येतील तेवढ्या लोकांची टेस्ट ही झालीच पाहिजे, नेमकी अडचण काय आहे, याची माहिती घेऊन पूर्तता केली जाईल.
- महापौर मुरलीधर मोहोळ