लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट, तसेच वाढवण्यात आलेल्या पुरवठ्यामुळे गेल्या दोन आठवड्यांत जिल्ह्याच्या ऑक्सिजनच्या मागणीत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्याला ४२० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. ही मागणी आता २५३ मॅट्रिक टनावर आली आहे.
जिल्ह्यात फ्रेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामुळे रुग्णांना लागणारा ऑक्सिजन पुरवठाही माेठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र, त्या तुलनेत त्याचा पुरवठा होत नव्हता. हा पुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनासमोर मोठे आवाहन होते. यामुळे उद्योगांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करून तो दवाखाने आणि कोविड केअर सेंटरसाठी वळवण्यात आला होता. मात्र, असे करूनही ऑक्सिजनच्या मागणीत सातत्याने वाढ होत होती. यामुळे परराज्यातून ऑक्सिजन पुण्यासाठी मागवण्यात आला होता. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून १० ऑक्सिजन प्रकल्प, तर काही सामाजिक संस्थांच्या निधीतून प्रकल्प उभारण्यात आले. ४९ ऑक्सिजन प्रकल्प उभरण्याचे उद्दिष्ट होते. यातील ८ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर ४१ काम प्रगतिपथवर आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेखही कमी होत असल्याने ऑक्सिजनची मागणी घटली आहे. मार्च महिन्यात ४२० मेट्रिक टन ऑक्सिजन जिल्ह्याला लागत होता. तर, ७ मे रोजी यात घट होऊन ही मागणी ३६१ मेट्रिक टनावर आली. तर, गेल्या बुधवारी (दि.१९) यात पुन्हा घट होऊन ऑक्सिजनची मागणी ही २५३ मेट्रिक टनावर आली. उणे १०८ टनाने आणि ३० टक्क्यांनी ही कपात गेल्या काही दिवसांपासून झाली आहे.
चौकट
ऑक्सिजन ऑडिटचा झाला फायदा
ऑक्सिजनची बचत व्हावी व जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ देण्यासाठी पुण्यात ऑक्सिजन ऑडिटची अभिनव कल्पना राबविण्यात आली. याचाही चांगला फायदा झाला. यासाठी ४५० हून अधिक रुग्णालयांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यासाठी २२५ पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ११० पथकांची स्थापना करण्यात आली होती. रुग्णालयांकडून सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म तसेच ऑडिटसाठी गुगल फॉर्म तयार करून ॲपची निर्मिती करण्यात आली होती. या वर आतापर्यंत ३५० हून अधिक रुग्णालयांनी ऑडिटचे काम पूर्ण केले आहे. तर ५७ रुग्णालयांची माहिती गुगल अर्जावर प्राप्त झाली आहे.
कोट