पुणे : ऑक्सिजन पातळी ४० पर्यंत खाली उतरलेली...एचआरसीटी स्कोअर २१...आधी न्यूमोथोरॅक्स, नंतर फुप्फुसांमध्ये झालेली बुरशी...दोन्ही फुप्फुसांची कमी झालेली कार्यक्षमता आणि तबबल ४५ दिवस हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटरवर सुरू असलेले उपचार, अशा भीषण आजाराशी झुंज देत ४ वर्षांचा प्रेम अखेर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडला. पालक आणि डॉक्टरांच्या टीमच्या शर्थीच्या प्रयत्नांना अखेर यश आले. कोरोना काळात मुलांमध्ये असे उदाहरण फार दुर्मिळ असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुण्यातील चार वर्षांच्या प्रेमला दिवाळीच्या तीन-चार दिवस आधी सर्दी, ताप असा त्रास सुरू झाला. तीन दिवसांनीही बरे वाटत नसल्याने पालकांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याला मोशीतील एका दवाखान्यात दाखल केले. दोन-तीन दिवसांत त्याचा त्रास खूपच वाढला. प्रेमला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला, प्रचंड खोकला येऊ लागला. ऑक्सिजनची पातळी ४० पर्यंत खाली गेली. दरम्यान, प्रेमला न्यूमोनियाचे निदान झाले. डॉक्टर फारसा प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
प्रेमचे वडील राहुल पवार म्हणाले, 'बेडची शोधाशोध सुरू होती, पण काही केल्या बेड उपलब्ध होत नव्हता. वायसीएम रुग्णालयातील डॉ. विनायक पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी मोठ्यांच्या वॉर्डमध्ये एक बेड असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे प्रेमला तिथे नेण्याचे ठरवले. तिथे पोहोचेपर्यंत तो बेड दुसऱ्या रुग्णाला देण्यात आला होता. डॉ. पाटील यांनी सहकार्य करत वायसीएमच्या रुबी केअर वॉर्डमध्ये त्याची सोय केली आणि उपचार सुरू केले. तीन दिवसांनी जहांगीर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असल्याचे कळल्यावर तेथील डॉ. सागर लाड यांच्याशी संपर्क साधून जहांगीरला हलवण्यात आले. तबबल ४५ दिवस प्रेमची आजाराशी झुंज सुरू होती. त्याला हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रेमला बरे वाटावे, यासाठी हरत-हेने प्रयत्न करण्याचे मी आणि पत्नी दीपाली पवार आम्ही ठरवले होते. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे प्रेम सुखरूप घरी परतला आहे. मुलांच्या आजाराचे योग्य निदान व्हावे आणि वेळेत उपचार मिळावेत, असे मनापासून वाटते.'
मुलांना न्यूमोनिया झाला तरी पालकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा
''आधी प्रेम वायसीएम रुग्णालयात अँडमिट होता. त्याला दम लागत होता, ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली. वायसीएममधील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कुलकर्णी यांनी मला संपर्क साधून बेडबाबत विचारणा केली. जहांगीरला आणल्यावर सुरुवातीला त्याला हाय फ्लो नेझल कॅन्यूला लावण्यात आला. त्याचा एचआरसीटी स्कोअर २१ असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचार सुरू असताना फुप्फुसांभोवती हवा जमा झाल्याचे अर्थात न्यूमोथोरॅक्सचे निदान झाले. त्यानंतर व्हेंटिलेटरवर लावून दहा-बारा दिवस उलटून गेल्याने ट्रकॅस्टोमी करण्यात आली. म्हणजेच श्वसननलिकेला छिद्र पाडून व्हेंटिलेटर बसवण्यात आला. डॉ. जसमित सिंग यांनी ट्रकॅस्टोमी केली. हाय फ्रिक्वेन्सीचे सेटिंग कमी वाटू लागल्याने मॅक्झिमम हाय फ्रिक्वेन्सी सेटिंगवर ठेवण्यात आले. दरम्यान, रेमडिसिव्हीर, स्टेरॉइड्स देण्यात आली. तीन आठवड्यानी प्रेमच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. दरम्यान, पोटातील मुख्य रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या. मग, गाठी पातळ होण्याचे इंजेक्शन सुरू झाले. फुप्फुसांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाला. तब्येत पुन्हा ढासळू लागली. त्याच्या श्वासनलिकेतील दरवपदार्थ तपासणीसाठी पाठवण्यात आला. निदानानुसार १४ दिवस ओम्फोसिरोटिन औषध देण्यात आले. डॉ. पियुष चौधरी आमच्याबरोबर होतेच. मी पुणे बालरोगतज्ज्ञ टास्क फोर्सचा सदस्य असल्याने तेथील डॉक्टरांशी चर्चा सुरू होती. हळूहळू प्रेमची तब्येत सुधारू लागली. ऑक्सिजन पातळी पूर्ववत झाली आणि तो पूर्णपणे बरा होऊन घरी गेला. अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यावर, लिटरेचर तपासल्यावर मुलांमध्ये अशा प्रकारचा कोरोना होत नसल्याचे लक्षात आले. आता तो ऑक्सिजनशिवाय राहू शकतो आहे, वजनही पूर्ववत झाले आहे, व्यवस्थित बोलतो, खेळतो आहे. मुलांना न्यूमोनिया झाला तरी पालकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा. मुले यातून नक्की बाहेर पडू शकतात असे जहांगीर हॉस्पिटलचे डॉ. सागर लाड यांनी सांगितले.''