पुणे : कोरोनाचा विषाणुचा विळखा अधिक घट्ट होऊ लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील ऑक्सिजन पाईपलाईनचे काम विक्रमी वेळेत पुर्ण केले आहे. तसेच चार मजल्यांवरील कोरोनासाठी आवश्यक सुविधाही महिनाभरात सज्ज केल्या आहेत. तब्बल एक तपाहून अधिक काळ या इमारतीचे काम सुरू आहे. पण कोरोनाने प्रशासनाला खडबडून जागे केल्याचे या कामावरून स्पष्ट झाले आहे.ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम २००८ पासून सुरू आहे. पण अपुरा निधी, निविदा प्रक्रियेतील विलंब, कामातील दिरंगाई अशा विविध कारणांमुळे या अकरा मजली इमारतीमध्ये १२ वषार्नंतरही रुग्णसेवा सुरू झाली नव्हती. इमारती बांधून उभी असली तरी आतील आवश्यक सोयी-सुविधांसाठी अजूनही किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता होती. पण कोरोना विषाणुचा प्रभाव वाढू लागल्यानंतर प्रशासनाला या इमारतीची आठवण झाली. जिल्हा प्रशासनाने तातडीने नवीन इमारतीला कोविड रुग्णालय म्हणून मान्यता देत तिथे आवश्यक सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिनाभरापुर्वी कामाला सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खांद्यावर ही जबाबदारी असल्याने अधिकाºयांनी याचे गांभीर्य ओळखून आधीपासून साफसफाई व इतर कामाला सुरूवात केली होती. रुग्णालयामध्ये तातडीने अतिदक्षता विभाग व विलगीकरण कक्ष तयार करण्याचा निर्णय झाला. यामध्ये महत्वाचे काम होते ते मेडिकल गॅस पाईपलाईन म्हणजे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे.द्रवरूपी ऑक्सिजन वायूत रूपांतर करून पुरवठा करण्याच्या या कामाला निविदा काढण्यापासून प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत किमान ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने रात्रंदिवस काम करून हे काम ११ दिवसांत पुर्ण केले आहे. त्यासाठी अॅटलास कॉपको कंपनीचे सहकार्य होते. या कंपनीच्या म्हणण्यानुसार विक्रमी वेळेत हे काम पुर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटर टरद्वारे दिली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील ५० बेड आणि पाचव्या व सातव्या मजल्यावरील प्रत्येकी ७० बेडसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे साफसफाई, इतर सुविधा, फर्निचर व वैद्यकीय उपकरणांची जुळवाजुळवही विक्रमी वेळेत करण्यात आली आहे. त्यासाठी १०० ते २०० कर्मचारी काम करत होते. इमारतीतील चार ते सात असे चार मजले रविवारी रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या कामांसाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागला असता, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विभागाचे उप अभियंता अनुराधा भंडारे, शाखा अभियंता देविदास मुळे, सहायक स्थापत्त्य अभियंता गणेश कांबळे, पंढरीनाथ फर्जने, उप अभियंता (विद्युत) अनघा पुराणिक, शाखा अभियंता हेमंत वाघमारे व सहकाऱ्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे.------------------------अकरा मजली इमारतीची क्षमता एक हजार बेडची आहे. पण सध्या चार ते सात या मजल्यांचे काम पुर्ण करण्यात आले आहेत. सातव्या मजल्यावर ५० बेडचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. तर चौथ्या मजल्यावर १४३, पाचव्या मजल्यावर १७५ आणि सातव्या मजल्यावर १५३ बेड विलगीकरण कक्षात आहेत. तसेत गरजेनुसार इतर मजल्यांवरही सुविधा केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.------------
ससूनमधील ऑक्सिजन पाईपलाईनचे सहा महिन्याचे काम झाले फक्त अकरा दिवसांत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 4:59 PM
कोरोनाने शासन खडबडून जागे
ठळक मुद्देकोरोना विषाणुचा प्रभाव वाढू लागल्यानंतर प्रशासनाला या इमारतीची आठवण