पुणे: पुण्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. शहरासह उपनगरताही रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेडचे कोव्हीड सेंटर उभारले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारावा अशी मागणी आमदार चेतन तुपे पाटील जिल्हाधिकारी यांना केली आहे. त्यासाठी निधी देण्याची तयारीही त्यांनी पत्रकाद्वारे दर्शवली आहे.
हडपसर मध्ये आमदारांनी प्रयत्न करून महापालिका आयुक्तांच्या मंजुरीने अण्णासाहेब मगर रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेड्चे कोव्हीड सेंटर उभारले आहे. पण त्यासाठी ऑक्सिजन पुरवठा होणे गरजेचे होते. म्हणूनच प्लांट उभारण्यासाठी आमदार निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे तुपे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे हडपसर मधील सर्व नागरिकांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या काळात उपमुख्यामंत्री अजित पवार यांनी आजारांवरील विविध उपाययोजनांसाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून आर्थिक तरतूद करण्यास मान्यता दिलेली आहे. सध्या शहरात ऑक्सिजनचा आणि बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणवर जाणवतो आहे. त्यामुळेच ऑक्सिजनयुक्त बेड बरोबरच रुग्णालयात २ टनचे २ किंवा ४ टनचा एक ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी देण्याचे ठरवले आहे असेही त्यांनी पत्रातून नमूद केले आहे.