लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील १८ साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांकडे १२ कोटी ७० लाख रूपये जमा केले आहेत. ‘रेडी टू यूज’ यंत्रसामग्री असलेले हे प्रकल्प महिनाभरात सुरू होऊन त्यातून दररोज किमान दीड हजार ऑक्सिजन सिलिंडर उत्पादित होणार आहेत.
धाराशिव साखर कारखान्याचा प्रकल्प सुरूही झाला आहे. त्यासाठी त्यांना २ कोटी रुपयांचा खर्च आला. त्यांचीच क्षमता दररोज एक हजार ऑक्सिजन सिलिंडर तयार करण्याची आहे. संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील हा एकमेव ऑक्सिजन प्रकल्प असल्याने जिल्ह्याला याचा चांगला फायदा होत आहे.
हवेतील ऑक्सिजन खेचून घेऊन त्यापासून वैद्यकीय कारणासाठीचा शुद्ध ऑक्सिजन या ‘रेडी टू यूज’ प्रकल्पांमधून तयार होतो. त्यासाठी विशिष्ट यंत्रसामग्री लागते. त्याचीच मागणी संबंधित यंत्र उत्पादित करणाऱ्या परदेशी कंपन्यांकडे या कारखान्यांनी नोंदवली आहे. धाराशिवच्या तुलनेत अन्य कारखान्यांचे प्रकल्प ५० लाख ते दीड कोटी रुपये खर्चाचे आहेत. त्यापासून दररोज कमाल ९० व किमान ५० सिलिंडर ऑक्सिजन तयार होतील.
सध्या कोरोना रुग्ण कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी घटली आहे. तरीही कारखान्यांसाठी हे प्रकल्प फायदेशीर ठरतील, असे साखरतज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारखान्यांनाही ऑक्सिजन लागतोच. शिवाय अनेक कारखान्यांची स्वतःची रुग्णालये आहेत. त्यामुळेच वैद्यकीय कारणांसाठीची मागणी घटली तरीही कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प फायद्याचा ठरेल, असे सांगण्यात आले.
चौकट
“साखर कारखान्यांनी परिसराच्या सामाजिक कामात नेहमीच सहयोग दिला आहे. कोरोनाकाळात त्यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी स्पृहणीय आहे.”
-शेखर गायकवाड, साखर आयुक्त
चौकट
या कारखान्यांनी नोंदवली ऑक्सिजन प्रकल्पांची मागणी
द्वारकाधीश (नाशिक), पांडुरंग सहकारी (सोलापूर), पूर्णा (हिंगोली), भाऊसाहेब थोरात, शंकरराव काळे, विठ्ठलराव विखे, (सर्व नगर), अजिंक्यतारा (सातारा), दूधगंगा वेदगंगा (कोल्हापूर), जवाहर (हातकणंगले), राजाराम बापू, दत्त इंडिया (सांगली), दत्त सहकारी (शिराळा), विठ्ठलसाई (उस्मानाबाद), नॅचरल शुगर (उस्मानाबाद), पराग अॅग्रो, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती अॅग्रो, व्यंकटेश कृपा शुगर (सर्व पुणे) या सहकारी व खासगी कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्पांची मागणी नोंदवली आहे.