भोर: भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणि वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.
भोर पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव याबाबत उपाययोजना व नियोजनाबाबत भोर व तालुक्यातील अधिकाऱ्याची बैठक आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, शिवाजी शिंदे, डाॅ. दत्तात्रय बामणे, डाॅ. सूर्यकांत कऱ्हाळे, मुख्यधिकारी विजयकुमार थोरात, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, डाॅ. अमित शेठ, डॉ सुरेश गोरेगावाकर आदी उपस्थित होते.
राजेंद्रकुमार जाधव यांनी सध्या वाढत असलेल्या कोरोनाबाबत माहिती देऊन भविष्यात करण्यात येणाऱ्या नियोजनाचा आढावा घेतला.
या वेळी तालुका आरोग्य अधिकारी सूर्यकांत कऱ्हाळे यांनी तालुक्यातील कोविड सेंटरची माहिती देऊन तालुक्यात चार हजार ११६ कोरोना रुग्ण असून उपचारानंतर दोन हजार ९७१ जणांना घरी सोडले आहे. सध्या एक हजार ४६ रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यत ९९ जणांचा मृत्यू झालेला आहे. रुग्णांना रिकव्हरी रेट ७१.६२ टक्के असून मृत्यू दर २.४० टक्के आहे. तालुक्यात रेमडेसिविर इजेक्शन ऑक्सिजनचा पुरवठा आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहे. त्याची मागणी केली. तर वेल्हे तालुक्यातील कोविड सेटर आणि सोयी-सुविधांबाबत माहिती देण्यात आली.
संग्राम थोपटे म्हणाले की, भोर-वेल्हे तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागत असून जम्बो ऑक्सिजन सिलिंडरसाठी सुमारे १५ लाख रुपये आमदार फंडातून देणार असल्याचे सांगितले. भोर व वेल्हे तालुक्यातील सर्व कोविड सेटर असलेल्या शासकीय दवाखाने व खासगी दवाखान्यातील बिलांचे आणि सुरक्षिततेबाबतचे ऑडिट करुन घ्यावे. यामुळे कोणत्याही गोर गरीब रुग्णांना दवाखान्याच्या बिलाचा भुर्दंड बसणार नाही. सौम्ये लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचा बेड देऊ नये, रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच पुरवठा काटकसरीने करावा. लव्हेरी- माजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजनची सुविधा असलेले नविन कोविड हेल्थ केअर सेंटरचे लवकरात लवकर काम करून सेंटर सुरू करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.