राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ऑक्सिजन ऑडिटमुळे राज्यातील २७९३ रुग्णालयांत ऑक्सिजनची रोजची २० ते २२ टक्के बचत झाली आहे. त्याशिवाय या समितीने याच रुग्णालयांचे स्ट्रक्चरल, फायर व इलेक्ट्रिक ऑडिटही करून या इमारती सुरक्षित केल्या आहेत.
राज्यातील सर्व सरकारी, तसेच खासगी रुग्णालयांचेही ऑक्सिजन ऑडिट करण्यात येत आहे. राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यासाठीच्या समितीचे प्रमुख आहेत. नियोजनबद्ध काम करून अनेक रुग्णालयांतील ऑक्सिजनचा अपव्यय कमी करणे शक्य झाल्याचे, शिवाय यापुढेही असा अपव्यय होणारच नाही अशी व्यवस्था केल्याचे नारनवरे यांनी सांगितले.
यासाठी जिल्हानिहाय समिती करून त्यात जिल्हाधिकाऱ्यांसह तांत्रिक, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सरकारी व खासगी तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. तांत्रिक (सिलिंडर व्हॉल्व्ह, नळ्या, वितरण) व वैद्यकीय (डोसचे प्रमाण) अशा दोन्ही स्तरांवर रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था काटेकोरपणे तपासली जाते. उपलब्ध ऑक्सिजनचा अतिरिक्त वापर, काही प्रमाणात गळती, तांत्रिक चुका अशा अनेक गोष्टी या तपासणीत आढळतात व त्या लगेच दुरुस्तही करून घेतल्या जातात असे नारनवरे म्हणाले.
याशिवाय संबंधित इमारतीची मजबुतीची चाचणीही होते. फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट केले जाते. त्यात त्रुटी आढळल्या तर त्याही समिती त्वरित दुरुस्त करून घेते. खासगी व सरकारी दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांंना हे बंधनकारक केले आहे. त्यातून या इमारती सुरक्षितही होत आहेत. समोरच कामे करून घेण्याच्या सूचना समितीला दिल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
रुग्णाला यापूर्वी ऑक्सिजन त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व डॉक्टरांच्या उपस्थितीतच दिला जात असे. आता रुग्णांची संख्या वाढल्यामुळे परिचारिकाही ऑक्सिजन देत असतात. त्यामुळे रुग्णालयांमधील परिचारिका तसेच त्यांनी सुचवलेल्या कर्मचाऱ्र्यांना ऑक्सिजन सुरक्षितपणे व डोसप्रमाणेच कसा द्यायचा, याचे ऑनलाईन प्रशिक्षणही दिले जात आहे. राज्यातील अन्य रुग्णालयांचीही याच पद्धतीने तपासणी सुरू आहे, असे नारनवरे यांंनी सांगितले.
तपासणी झालेली रुग्णालये- २७९३
ऑक्सिजन बेड- ८८७६१
आयसीयू बेड- २४५९८
व्हेंटिलेटर बेड- ९४५८
ऑक्सिजनच्या नोंदी पाठवणे बंधनकारक
तपासणी झालेल्या सर्व रुग्णालयांना त्यांच्या ऑक्सिजन वापराच्या रोजच्या नोंदी पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या व उपलब्ध ऑक्सिजन व त्याचा रोजचा वापर याची सतत तुलना करून त्यानुसार रुग्णालयांना वापराविषयी सूचना केल्या जातात. आता राज्यातील सर्व जिल्ह्यात किमान ४८ तास तरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही इतका ऑक्सिजन उपलब्ध आहे.