चाकणला १५० मे.टनाचा प्रकल्प सुरू
बारामती: ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यासाठी चाकण येथे १५० मे. टनाचा प्रकल्प सुरू केला आहे. लसीचा तुटवडा असला, तरी देखील जिल्ह्यातील सर्व आरोग्य आणि उपकेंद्रांना लस देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी दिली.
बारामतीत कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासनाने लक्ष घातले आहे. प्रसाद यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी (दि. ५) बैठक घेतली. या वेळी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
प्रसाद पुढे म्हणाले की, रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रामीण भागातही ऑक्सिजन प्लँट वाढवत आहोत. विलगीकरण कक्ष, होम आयसोलेशन यासाठी सर्व्हे व्यवस्था केली आहे. खाजगी डॉक्टरांना मार्गदर्शन करून त्यांचाही यात सहभाग घेत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. प्रधानमंत्री केअर फंडातून २०० व्हेंटिलेटर मिळाले आहेत. गरजूंना ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड मिळण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत लसीचा तुटवडा लवकर दूर करण्याचे आश्वासन प्रसाद यांनी दिले.