लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खासगी संस्था, कंपन्या, बँका आदींच्या मदतीमधून महापालिकेने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तीन प्रकल्प उभे राहिले असून, यातून ३ हजार लिटर प्रति मिनीट अशी ऑक्सिजन निर्मिती होऊ लागली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील आरोग्य व्यवस्थेला मोठा तडाखा बसला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून होत गेलेल्या रुग्णवाढीमुळे शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या खाटांची मागणी वाढली. याच काळात ऑक्सिजन कमी पडू लागल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. सर्व कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी पडू लागल्याने जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बचतीचा वेगळा प्रयोगही करण्यात आला. हा प्रयोग अन्य रुग्णालयातही राबविण्यात आला असून, दिवसाला १० टन ऑक्सिजनची बचत केली जात आहे.
पालिकेला स्वतःच्या रुग्णालयात, तरी ऑक्सिजन प्रकल्प असावेत अशी आवश्यकता भासू लागली. उद्योग समूह व अन्य कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्यात आला. काही ठिकाणी पालिकेने खर्च केला. पालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखाना, दळवी रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि बाणेर जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यातील, लायगुडे, दळवी आणि नायडूमधील प्रकल्प सुरू झाले तर, बाणेर येथील प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. खेडेकर, बाणेर, वारजे, नायडू आणि इंदिरानगर येथील रुग्णालयांमध्येही आणखी सहा प्रकल्प प्रस्तावित आहेत.
--///--
ऑक्सिजन निर्मिती सुरू झालेले
रुग्णालय। क्षमता (लिटर प्रति मिनीट) । खर्च
मुरलीधर लायगुडे। ३००। ५० लाख
दळवी रुग्णालय। १७००। २ कोटी १० लाख
नायडू रुग्णालय। ८५०। १ कोटी ५० लाख
बाणेर जम्बो सेंटर। २४ टन। १ कोटी ३० लाख (कामाची ऑर्डर दिली)
------
नियोजनात असलेले प्रकल्प
रुग्णालय। क्षमता (लिटर प्रति मिनीट) । खर्च
खेडेकर। ६००। ८० लाख
बाणेर (नवीन) । १०००। १ कोटी ५० लाख
बाणेर जम्बो सेंटर। २०००। ३ कोटी
वारजे। ८५०। १ कोटी ५० लाख
नायडू। ८५०। १ कोटी ५० लाख
इंदिरानगर। ८५०। १ कोटी ५० लाख
-----