पुणे : अभ्यास केला नाही आणि पुस्तक घरी विसरले म्हणून विद्यार्थ्यांना छडीने हात सुजेपर्यंत मारणाऱ्या शिक्षकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला. त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हात सुजेपर्यंत मारल्याच्या घटनेला सर्वप्रथम लोकमतने वाचा फोडली. स्नेहा जोगळेकर यांच्या मुलीसह शाळेतील इतरही काही मुलांना जयदीप लक्ष्मण भोसले (वय ३३, रा. कदम वस्ती, शिवणे) या शिक्षकाने छडीने मारले होते. जोगळेकर यांनी याबाबत शाळेकडे तक्रार केली होती. मात्र, शिक्षकावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे शनिवारी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन केले. शिक्षकावर निलंबनाची कारवाई करून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा मोर्चाचे विनोद चव्हाण यांनी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केले. पालक स्नेहा जोगळेकर म्हणाल्या, ‘‘शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात सुमारे २० मुलांना छडीने मारल्याचे दिसून येत आहे. संबंधित शिक्षकावर कारवाई करावी, यासाठी मी पी. जोग शाळेच्या अमोल जोग यांची भेट घतली. प्रथमत: त्यांनी कारवाई करण्यास असमर्थता दाखवली. मात्र, संघटनांचा दबाव वाढल्यामुळे शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)कोणत्याही शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून मारहाण करू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देऊनही वारंवार विद्यार्थ्यांना छडीने मारल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्याच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालकांमार्फत सर्व शाळांना पुन्हा एकदा याबाबतच्या सूचना दिल्या जातील.डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त, राज्य शिक्षण विभागशाळा प्रशासनाने शनिवारी पालकांची बाजू समजावून घेतली. तसेच शाळेकडील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. शाळा प्रशासनाने भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. - विनीता पुरी, मुख्याध्यापिका, पी. जोग स्कूल
‘पी. जोग’च्या शिक्षकाला अटक
By admin | Published: October 18, 2015 2:59 AM