श्रीकांत शिरोळे
पुणे :पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाचा प्रयोग पुण्यात होणार होता. वातानुकूलित नाट्यगृह असेल तरच पुण्यात प्रयोग करेन, अशी ‘पुलं’ची अट होती. त्यावेळी महाराष्ट्र मंडळामध्ये मंडप टाकून, एसी लावून प्रयोग लावण्यात आला. पुण्यात सांस्कृतिक केंद्र उभे राहावे, अशी कल्पना त्यावेळी पु. ल. देशपांडे यांनी मांडली आणि महापालिकेने संकल्पना उचलून धरली. सध्याच्या जागेत नाट्यगृह उभे करावे, असे तत्कालीन महापौर भाऊसाहेब शिरोळे यांनी सुचवले. त्यानंतर १९६२ मध्ये शिवाजीराव ढेरे महापौर असताना बालगंधर्वांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन झाले. हा प्रकल्प पूर्ण व्हायला ६ वर्षे लागली. बी. जी. शिर्के आणि कंपनीने हा प्रकल्प उभारला आणि २६ जून १९६८ रोजी रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
त्यावेळी १६ जून १९६८ रोजी महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. शिवाजीनगर गावठाण आणि डेक्कन जिमखाना हा माझा मतदारसंघ होता. नगरसेवक असल्याने मी बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होतो. त्यावेळी मी २२ वर्षांचा होतो. व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण, पु. ल. देशपांडे, नानासाहेब गोरे, भुजंगराव कुलकर्णी असे मान्यवर उपस्थित होते. आचार्य प्र. के. अत्रेही उपस्थित राहणार होते. मात्र, तब्येत बरी नसल्याने त्यांनी लेखी संदेश पाठवला होता.
कोणत्याही शहराला सांस्कृतिक नाट्यगृहाची कशी आवश्यकता असते, हे यशवंतरावांनी अधोरेखित केले. ‘पुलं’ म्हणाले, ‘जीवनामध्ये नाट्य असले पाहिजे, तरच मजा येते. बालगंधर्वांसारख्या पुरुषाने स्त्रीचे काम समर्थपणे पेलले आणि बाहेर पुतळा असलेल्या राणी लक्ष्मीबाईने स्त्री असून, पुरुषासारखे कर्तृत्व गाजवले,’ हे त्यांचे भाष्य आजही प्रसिद्ध आहे.
बालगंधर्वच्या इमारतीसाठी केवळ ४० लाख रुपये खर्च!
बालगंधर्व रंगमंदिराची सध्याची इमारत बांधण्यासाठी त्यावेळी केवळ ४० लाख रुपये खर्च आला होता. आता पुनर्विकासासाठी १०० कोटी रुपये खर्च करून त्यातून परतावा किती मिळणार आहे, याचा महापालिकेने विचार करायला हवा. कोणत्याही ऐतिहासिक शहराच्या वाढीला काही मर्यादा असतात. विकासाच्या नावाखाली लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता मोठा करता येईल का? विश्रामबागवाडा पाडता येईल का? शहरात इतिहासाच्या अनेक खुणा आहेत. लंडनमध्ये आजही शेक्सपिअरचे घर जतन करून ठेवले आहे. पुढील पिढ्यांना इतिहास शिकवायचा की विकासाच्या नावाखाली इतिहास जमीनदोस्त करायचा?
(शब्दांकन : प्रज्ञा केळकर-सिंग)