पु. ल. आणि सुनीताबार्इंचा सहवास ‘आशय’च्या माध्यमातून आम्हाला लाभला आणि विनोदकार पु. ल. यांच्या पलीकडची रूपंही ‘आशय’ला पाहायला मिळाली. पुलंनंतर आशयला सुनीताबार्इंनी पुलोत्सवामध्ये तेच तेच कार्यक्रम नकोत, तरुणाईला व्यासपीठ देण्यात यावे, असे नियम घालून दिले . ते निकष आम्ही अजूनही पाळत आहोत. कोणतेही संयोजन परफेक्ट, सर्वसमावेशक प्रेक्षकांना गृहीत धरून कसे असावे या गोष्टींचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले. आमच्यासाठी पु. ल. हे वेगळे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ते म्हणाले, आशय फिल्म क्लबमुळे आमचा पुलंशी ॠणानुबंध जुळला. पु. ल. आणि सुनीताबार्इंनी ‘आशय’चे पहिले आजीवन सदस्यत्वपद घेतले. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. आम्हाला बोलावून १000 रुपये देऊन हे सदस्यत्व घेणे, हे आमच्यासाठी खूप संकोचल्यासारखे होते. कारण त्या वेळची परिस्थिती अशी होती, की विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रणाचे पास द्यायचे. ते आले तर आम्हाला आनंद व्हायचा. पण एखादा माणूस जेव्हा आपणहून पैसे काढून सदस्यत्व घेतो तेव्हा खूप वेगळी भावना असते. यानंतर पुलंनी आणि सुनीताबार्इंनी ‘आशय’मध्ये रस घेण्यास सुरुवात केली. त्या काळी फेडरेशनच्या माध्यमातून जागतिक चित्रपट दाखविण्यासाठी कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या.जागतिक स्क्रीन थिएटर अशी कोणती संकल्पना नव्हती. एकपडदा थिएटर होते, पण त्यामध्ये ही सोय नव्हती. जागतिक चित्रपट दाखविण्याकरिता थिएटर देत नव्हते. कारण आमचा चित्रपट पाहायला असे किती जण येणार? त्या वेळी आशयशी असोसिएट होतो पण फारसा सक्रिय नव्हतो. आशय १९८५मध्ये स्थापन झाले. पुलंशी काही कारणांमुळे परिचय होताच. जेव्हा पहिला संयुक्त प्रकल्प ठरला, तो म्हणजे ग्रंथालीने ‘ग्रंथमोहोळ’ आणि ग्रंथयात्रा काढली. ग्रंथालीची वाचक चळवळ सुरू होती. त्यानिमित्त ग्रंथाली, आशय फिल्म क्लब आणि माझा परिचय यांनी एकत्रपणे १९८८मध्ये ‘ग्रंथमोहोळ’ केले. त्या वेळी विनोदी चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. ही गोष्ट टिळक स्मारक मंदिरात पहिल्यांदाच घडली होती. त्या वेळी डीव्हीडी नव्हत्या, जागोस नावाची एक एजन्सी होती. त्याच्याकडे ३५ एमएमचे प्रोजेक्टर भाड्याने मिळायचे, ते प्रोजेक्टर तिथे लावण्यात आले आणि त्यावर आठ दिवसांचा हा महोत्सव साजरा करण्यात आला होता. ‘गुळाचा गणपती’ चित्रपटाला पु.ल. स्वत: आले होते. पुलंचा मोठेपणा इथे होता, की ज्या वेळी त्यांना कळले, की जागतिक चित्रपट दाखविण्यासाठी पुण्यात थिएटर नाही, तेव्हा प्रोजेक्टरचा किती खर्च आहे हे विचारले आणि दोन ३५ एमएमचे प्रोजेक्टर घेण्यासाठी पैसे दिले. त्या वेळी फर्ग्युसनचे थिएटर हे मिनी थिएटरमध्ये परावर्तित झाले. तिथे शासनाच्या फिल्म क्लबला वितरित करण्यात येत असलेले पॅनोरमिक चित्रपट दाखविण्यास सुरुवात केली. या सर्वांमध्ये पु.ल. आणि सुनीताबाई या ‘आशय’च्या आजीवन सदस्य राहिल्या नाहीत तर त्यांनी आशयचे पालकत्व स्वीकारले. अत्यंत बारीकसारीक गोष्टींमध्ये ते रस घेऊ लागले. पुलंच्या ८0व्या पदार्पणानिमित्त पुण्यातील काही संस्थांनी ‘पु.ल. ८0’ आणि ‘बहुरूपी पु. ल.’ वर्षभरापूर्वी करायचे ठरले आणि पुलंच्या वाढदिवसाला समारोप करायचा असे ठरले. पुलंना भावतील अशा चित्रपटांचा महोत्सव आम्ही केला. दुर्दैवाने पुलंचे निधन झाल्यानंतर मग सुनीताबार्इंच्या सल्ल्यानुसार त्यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या नावाने एखादा महोत्सव करावा असे ठरले. मग ‘पुलोत्सव’ सुरू झाला. महोत्सव अनेक होते पण त्यात पुलंचा बहुरूपी अंतरभाव असेल. पुलंना जे जे आवडले, एखादी संस्था किंवा व्यक्ती चांगली काम करते असे वाटते त्यांना पुलंनी सढळ हाताने मदत केली. पण त्याचा कधी गवगवा केला नाही. पुस्तकांच्या रॉयल्टीमधून जी काही रक्कम मिळायची ते ती संस्थांना द्यायचे. म्हणून पु.ल. हे महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्वं मानलं जायचं. विनोदकार पु.ल. यांच्या पलीकडची रूपं ही आशयला पाहायला मिळाली. पुलोत्सवात फक्त पुलंच नकोत तर, तरूणांनाही सहभागी करावे असा नियम सुनिताबाईंनी घालून दिला.
पुलंनी सदस्यत्वच नव्हे ‘पालकत्व’ स्वीकारले - वीरेंद्र चित्राव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 2:14 AM