पुणे : समान पाणी योजनेतील जलवाहिन्या बदलण्याच्या १ हजार ८०० कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेची सीबीआयकडून चौकशी होणार असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी शुक्रवारी केली. सीबीआयने या संदर्भात पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र पाठवले असून त्यांनी ते दडवून ठेवल्याचा आरोप शिंदे यांनी केला.या कामाच्या निविदांवरून गेले महिनाभर महापालिकेत वादंग सुरू असून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. यात आता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला असून थेट मुख्यमंत्र्यांकडेच या सर्व प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. शिंदे यांनी शुक्रवारी त्यावर कडी करीत सीबीआयच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. काँग्रेसबरोबरच आपल्या सत्ताकाळात ही योजना मंजूर करणाºया राष्ट्रवादी काँग्रेसनेही योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे.शिंदे म्हणाले, सीबीआयने पत्र पाठवून निविदा प्रक्रियेच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. यापूर्वी कधीही पालिकेत सीबीआयचा प्रवेश झाला नव्हता. पाणी योजनेतील या भ्रष्टाचाराबद्धल काँग्रेसने आवाज उठवला, त्याची दखल घेतली गेली आहे. आयुक्तांनी ते पत्र लपवून ठेवले.संजय कानडे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत सीबीआयने महापालिका आयुक्तांनी या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, असे आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. कानडे यांनी याआधी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यात त्यांनी संगनमताने ठेकेदार कंपन्यांनी व महापालिका अधिकाºयांनी जादा दल लावून हे काम मिळवले असल्याचे म्हटले आहे. महापौरांना पाठवलेले पत्रच त्यांनी सीबीआयकडे पाठवले. सीबीआयने त्याची दखल घेऊन आयुक्तांना पाठवलेल्या पत्रासोबत हेही पत्र जोडले आहे व आयुक्तांनी याची चौकशी करावी, असे म्हटले आहे. दरम्यान आयुक्त कुणाल कुमार शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित नव्हते. त्याची चर्चा सभेत झाली.
पाणी योजनेची चौकशी सीबीआयकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 6:21 AM