पुणे : शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, तसेच वाहतूककोंडीमुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीचा वेग गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच मंदावलेला आहे. अनेक गाड्या वाहतूककोंडीत अडकल्याने गेल्या दोन दिवसांत सुमारे ६०० फेऱ्या रद्द झाल्या असून, सुमारे १० ते १५ लाख रुपयांचा फटका बसला आहे. याशिवाय गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने शालेय विद्यार्थी, तसेच चाकरमान्या पुणेकरांचे चांगलेच हाल झाले आहेत. शहरात गेला आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. याशिवाय दोन दिवसांपासून शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने, सिग्नल व्यवस्थाही बंद असल्याने सर्व प्रमुख रस्ते वाहतूककोंडीने ग्रासलेले आहेत. विशेषत: सकाळी कार्यालये भरण्याच्या वेळी आणि संध्याकाळी शाळा, कार्यालये सुटण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून, अनेक बस दोन ते तीन तास उशिराने मार्गावर धावत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक दिवशी सरासरी अडीचशे ते तीनशे बसफेऱ्या रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यात प्रामुख्याने लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांचा समावेश असून, कात्रज, सिंहगड रस्ता, औंध, बाणेर, निगडी, हडपसर, नगर रस्ता, या मार्गावरील फेऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली असल्याची माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. प्रवाशांचा खोळंबा शहरातील वाहतूककोंडीमुळे पीएमपीचे वेळापत्रकच कोलमडले असून, तब्बल १२ लाख प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. गाड्या वेळेवर येत नसल्याने अनेक बसथांबे सकाळपासूनच गर्दीने भरून वाहत होते. त्यात प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांचा समावेश होता. तर, शाळकरी मुलांचीही मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. गाड्या उशिराने धावत असल्याने, तसेच अनेक फेऱ्या रद्द झाल्याने स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मिळेल ती गाडी पकडण्यासाठी या मुलांना चांगलीच कसरत करावी लागत होती. तर, सायंकाळी पाच वाजता घरी निघालेल्या अनेक चाकरमान्यांना रात्री उशिरा घरी पोहोेचावे लागले.
पीएमपीचा वेग मंदावला
By admin | Published: July 13, 2016 1:01 AM