पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, प्राथमिक उपचारांची औषधे आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. नजीकच्या काळात राज्यातील महिला कारागृहांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन आणि त्यांच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटरची यंत्रणा उभी करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. लैंगिक हिंसाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी नो या मोबाईल अॅपचे उद्घाटन सोमवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. लैंगिक हिंसेला प्राथमिक प्रतिबंध या कार्यक्रमांतर्गत केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि बर्लिन इन्स्टिट्यूट आॅफ सेक्सॉलॉजी या संस्थांनी भारतातील तज्ज्ञ सल्लागार मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या वेळी आंध्र प्रदेश सरकारच्या गृह खात्याचे सल्लागार दुर्गाप्रसाद कोडे, ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे आणि शशांक केतकर उपस्थित होते. ‘पॅडमॅन’ चित्रपटाचे कौतुकही त्यांनी या वेळी केले. राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, प्राथमिक उपचारांची औषधे आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. खासगी शाळा आणि महाविद्याालयांना ही अशा प्रकारची सुविधा देण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. भविष्यातदेखील या विषयावर काम करण्यासाठी योजना राबविल्या जाणार आहेत. खेडेगावांतील शाळांमध्ये मुलींना मासिकपाळीसंबंधी माहिती देणे, अस्मितासारख्या स्थानिक गटांकडून बनवून घेतलेले सॅनिटरी नॅपकिन सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे हे महिला आयोगाचे उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
संकटात सापडलेल्या महिलेला मिळणार मदत...संकटात सापडलेल्या व्यक्तींसाठी अनेक मोबाईल अॅप्स उपलब्ध आहेत. मात्र, नो हे मोबाईल अॅप पोलिसांच्या कॉलसेंटरशी थेट जोडण्यात आले आहे. त्यामुळे संकटात सापडेल्या व्यक्तीला खात्रीशीर मदत मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे समाजात वावरत असताना धोक्याचे प्रसंग उद्भवले किंवा तशी शंका आली, तरी हे मोबाईल अॅप वापरता येणे शक्य आहे. नो हे मोबाईल अॅप अतिप्रसंग होत असलेल्या घटनांचे प्रत्यक्ष ठिकाण शोधून त्या ठिकाणाची माहिती संकटग्रस्त व्यक्तींच्या परिवारातील सदस्यांना, तसेच त्या परिसरातील नजीकच्या नो अॅप वापरकर्त्यांना आणि पोलिसांना कळवण्याचे काम करणार आहे. प्रतिसाद या अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिसांबरोबर जोडले राहण्याचे कामही नो हे अॅप करणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.