जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या ११३ एकर जमिनीबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी (दि.१५) आपल्या फेसबुक पोस्ट आणि ट्वीट करून जे आरोप केले आहेत ते निराधार व राजकीय आकसापोटी केलेले असून जेजुरीचा खंडेराया हे धार्मिक न्यास असून येथील विश्वस्त मंडळ निःपक्षपातीपणे काम करत आहे. सर्वसामान्य भाविकांना सोईसुविधा आणि आपत्कालीन - नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वंचित दुर्बल घटकांसाठी कार्यरत राहणे हे समितीचे धोरण असून तशी वाटचाल आतापर्यंत केली आहे. त्यामुळे धार्मिक बाबतीत कोणीही राजकारण आणू नये किंवा राजकीय आकसापोटी बेजबाबदार विधाने करू नये , अशी टिप्पणी मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात येत आहे.
पडळकरांनी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही बोलू नये, वस्तुस्थिती पाहून विधाने करावीत असे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी देव संस्थानच्या ११३ एकर जमिनीबाबत जे विधान केले ते अत्यंत बेजबाबदारपणाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी विश्वस्त राजकुमार लोढा , शिवराज झगडे ,ॲड. अशोकराव संकपाळ ,सॉलि. प्रसाद शिंदे , संदीप जगताप ,मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते .
जेजुरीच्या खंडेरायाच्या नावे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून सुमारे ११३ एकर जमीन माहिती अधिकाराच्या माध्यमातून आढळून आली आहे .कागदपत्रे संकलित करून माहिती मिळवण्यासाठी विश्वस्त शिवराज झगडे हे दोन वर्षांपासून कार्यरत आहेत .सणसर ,तरंगवाडी (ता. इंदापूर), चाकण (ता. खेड), पिसर्वे (ता. पुरंदर), गिरवी ,सांगवी (ता. फलटण ), देगाव ,लिंब (ता. सातारा ) येथील ११३ एकर जमीन ही ,खंडोबा देव ,खंडेराव देव ,मार्तंड देव या नावे ७/१२ उतारा नोंदी असलेल्या जमिनी निर्धोकपणे देव संस्थानच्या मालकीच्या असून उपलब्ध कागदपत्रे पाहता सिद्ध झाले आहे .तसेच तेथील सर्वसामान्य शेतकरी या जमिनी कसत आहेत .सध्या या जमिनीच्या मोजणीचे अर्ज व रक्कम भरण्यात आलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी देव संस्थानशी संपर्क साधून कसत असलेल्या जमिनीचा खंड भरण्याची तयारी दर्शविलेली आहे, अशी माहिती प्रमुख विश्वस्त निकुडे पाटील यांनी दिली.
मागील आठवड्यात मध्यप्रदेश मधील देव संस्थान मालकीच्या जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे . त्या निर्णयाचा मोठा दिलासा देशातील देव संस्थानांना मिळाला आहे. त्या अनुषंगाने खंडोबाच्या मालकीच्या जमिनीबाबत देव संस्थान विश्वस्त मंडळ कायदेशीर प्रक्रिया राबवत असल्याचे विश्वस्त अशोकराव संकपाळ यांनी सांगितले.
देव संस्थानकडे जमिनीबाबत ३ गावे वगळता कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. परंतु दोन वर्षात सनदनाम्यासह सर्व कागदपत्रे उपलब्ध करण्यात आलेली असून सर्व जमिनीतून देव संस्थानच्या तिजोरीत भर पडून कोषागारात उत्पन्न वाढणार आहे. व त्यातून भाविक भक्तांना सोईसुविधा देण्याचा प्रयत्न असून यामध्ये कोणीही राजकारण आणू नये असे ज्येष्ठ विश्वस्त राजकुमार लोढा यांनी सांगितले.
पुरंदरचे आ. संजय जगताप यांनीही आ. पडळकरांच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. गोपीचंद पडळकरांनी त्यांचे राजकारण राजकीय पटलावर करावे, धार्मिक क्षेत्रात राजकारण आणू नये. त्यांच्या ट्वीटमध्ये त्यांनी जो काका पुतण्याचा उल्लेख केला आहे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे विधान आहे. असले बोगस आरोप करू नयेत, महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या बाबतीत राजकारण करू नये. गेल्या दोन तीन वर्षात देव संस्थानला सुमारे ११३ एकर जमीन असल्याची माहिती मिळाली, त्यांनी त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांशी संपर्कही साधला आहे. पडळकरांनी त्यांचे राजकारण जेजुरी व जेजुरी देव संस्थानच्या पायरी बाहेर ठेवावे असे म्हटले आहे.