राजगुरुनगर : खेड तालुक्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे, भातशेतीचे नुकसान झालेल्या १०६ गावांतील १७५१ हेक्टर भात क्षेत्रासाठी ७८ लाख ७९ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई शासनाने मंजूर केली आहे. ही भरपाई लगेचच शेतकऱ्यांना वाटण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिली.गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. या पावसात सर्वात जास्त भातपिकांचे नुकसान झाले होते. या वेळी पंचायत, महसूल आणि कृषी खात्याकडून या भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. भातपिकावर कापणी प्रयोग करून सरासरी नुकसान काढण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील वाडा आणि पाईट मंडल विभागातील १०६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई रक्कम मंजूर झाली आहे. खेड तहसील कार्यालयाकडे ती प्राप्त झाली आहे. पाईट मंडल विभागातील ५२ गावांतील भातपिकाखालील १२११ हेक्टर क्षेत्रासाठी ५४ लाख ४९ हजार रुपये आणि वाडा मंडल विभागातील ५४ गावांतील ५४० हेक्टर क्षेत्रासाठी २४ लाख ३० हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. (वर्ताहर)
भातशेतीची नुकसान भरपाई आली
By admin | Published: April 02, 2015 5:53 AM