तळेघर : अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून अलीकडे शेती केली जात आहे. मात्र, या सर्वांपासून आदिवासी कोसो दूर होता. परंतु, आता आदिवासीदेखील तंत्रज्ञाचा वापर करू लागले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात चिखली येथे आदिवासी शेतकरी विजय आढारी यांनी प्रथमच आधुनिक यंत्राचा वापर करून भात लागवड केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी पाच हजार १०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. परंतु गेले कित्येक वर्षे या भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने भातलागवड केली जात आहे. परंतु, अलीकडे पावसाच्या अनियमितता व अनिश्चिततेमुळे भातपीक हे निसर्गाच्या संकटात सापडत चालले आहे. कधी पाऊस पडतो तर कधी दडी मारतो. कधी तर ऐन भात लागवडीच्या वेळेतच मुसळधार पाऊस पडतो. यामुळे सार्वत्रिक भात लागवड सुरू झाल्यामुळे भात लागवडीसाठी मजूर मिळत नाहीत. परिणामी भात लागवडी रखडल्या जातात त्यामुळे आता आधुनिक यंत्राचा वापर करुन शेती करणे गरजेचे झाले आहे.
आदिवासी भागातील चिखली येथील शेतकरी शांताराम आनंदराव आणि विजय आढारी यांच्या शेतात यंत्राद्वारे भातलागवड करण्यात आली. भात लागवड करण्यासाठी चालविण्यात आलेल्या मशीनचे सारथी म्हणून मढ पारगाव (ता. जुन्नर) येथील सरपंच अर्जुन घोडे यांनी सहकार्य केले. निसर्गाचा लहरीपणा, अनियमित पाऊस, रोपवाटिका तयार करताना खर्च होणारा वेळ, तसेच उपलब्धता या सर्व अडचणी सोडविण्यासाठी यंत्राद्वारे भातलागवड हा उत्तम पर्याय होऊ शकतो. त्यादृष्टीने चिखली येथे प्रायोगिक तत्त्वावर पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय आढारी यांनी दिली.
हे प्रात्यक्षिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरूनगर मनोजकुमार ढगे, संचालक विवेक काकडे, शिव चिदंबर ट्रॅक्टर यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने राबविण्यात आली. या वेळी सरपंच अनिता आढारी, मंडळ कृषी अधिकारी डिंभे कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, ग्रामसेवक हनुमंत तारडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
भातपीक लागवडीसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, आत भातपीक लागवडीसाठी यंत्र उपलब्ध झाले असून मजुरी आणि वेळ याची मोठी बचत होणार आहे. शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे भातपीक लागवड करावी.
टी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव
२८तळेघर शेती
चिखली येथे आधुनिक पद्धतीचा अवलंब करून यंत्राद्वारे भातलागवड करण्यात आली.