पुणे : महापालिकेचे कर व इतर उत्पन्नामध्ये दरवर्षी वाढ होत आहे त्याचबरोबर शहरामध्ये आयटी कंपन्या, शैक्षणिक केंद्रे यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. पालिकेची गुंतवणूक क्षमता ही कर्जाची परतफेड करण्याच्या दृष्टीने योग्य आहे, असे नमूद करून पुणे महापालिकेला ‘आयएनडी एए प्लस’ मानांकन बहाल करण्यात आले आहे. या मानांकनामध्ये महापालिकेची बाजारातील पत वाढणार असून आंतरराष्ट्रीय बँकांकडून कर्ज उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील महापालिकांचे पत मानांकन निश्चित करण्याचे काम इंडिया रेटींग अॅन्ड रिसर्च प्रा. लि. या कंपनीकडून नुकतेच पार पाडण्यात आले. मुंबई पाठोपाठ केवळ पुण्याला ‘एए प्लस’ मानांकन मिळाले आहे. पुणे महापालिका ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महापालिका आहे. पुण्याची क्रेडीट रेटींग काढण्याची कार्यवाही एप्रिल २०१५ पासून सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये पुणे महापालिकेच्या मानांकनामध्ये वाढ झाली असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. या वेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर उपस्थित होत्या. महापालिकेचा मागील ५ वर्षांचा ताळेबंद, जमा-खर्च, पुढील ५ वर्षांचे अपेक्षित उत्पन्न व खर्च, पालिकेच्या मालकीच्या मालमत्ता, जमा-खर्च, नियोजित भांडवली प्रकल्प, गुंतवणूक, कर्जे आणि उत्पन्नाचे स्रोत, सद्यस्थितील मोठे प्रकल्प व नियोजित भांडवली प्रकल्प याचा माहिती अभ्यास इंडिया रेटींग कंपनीमार्फत करण्यात आला. त्यामध्ये त्यांना आढळून आलेल्या बाबींचा विशेष उल्लेख पुढीलप्रमाणे करण्यात आला आहे. महापालिकेच्या क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे. उत्पन्नाचे स्रोत असलेल्या कर व करेतर उत्पन्न यामध्ये वाढ दिसून येते. तसेच उत्पन्न संकलनाची क्षमताही वाढलेली आहे. नागरी सोयीसुविधा पुरविण्याच्या टक्केवारीमध्ये तसेच सोयीसुविधांवर होणाऱ्या खर्चाचे संकलनाची क्षमता वाढली आहे. पालिकेची गुंतवणूक क्षमता ही कर्जाची परतफेड करण्याच्या दृष्टीने योग्य आहे.महापालिकेची पत वाढल्यामुळे केंद्र शासनाची स्मार्ट सिटी योजना, स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, डिजीटल इंडिया, हाऊसिंग फॉर आॅल तसेच शासन पुरस्कृत योजनांमध्ये सहभागी होण्यामध्ये मोठी मदत होणार आहे, असे दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)केवळ २११ कोटींचे कर्जवर्षाला साडे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या पुणे महापालिकेवर केवळ २११ कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी दिली. पालिकेला ‘एए प्लस’ मानांकन मिळाल्यामुळे पुढील काळात कर्जरोखे उभारण्यासाठी मोठा फायदा होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेची बाजारातील पत वाढली
By admin | Published: November 19, 2015 4:58 AM