भोर तालुक्यात पश्चिम व पूर्व असे दोन भाग पडत असून पश्चिम भागात नीरा-देवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे तर, भाटघर धरण भागातील भुतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे खोरे, आंबवडे खोरे भागात दरवर्षी वळवाचे पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. मात्र, यावर्षी पेरणीला थोडा उशिरा झाला आहे. शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी, कुडली गुढे, निवंगण शिळिंब, अशिपी, उंबार्डे, हिर्डोशी गावांत भाताची पेरणी सुरू झाली आहे, असे हिर्डोशी येथील शेतकरी संदीप धामुणसे यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्व भागातील पुणे-सातारा महामार्गावरील आजूबाजूची गावे, भोंगवली भागातील गावे, वीसगाव खोरे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीला चांगला वाफसा आल्यावरच भाताच्या बियाणांची पेरणी केली जाते. पूर्व भागात भात हे प्रमुख पीक असून, यात हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जात असून, गरव्या जातीत इंद्रायणी, बासमती, आंबेमोहर, पुसा बासमती, तामसाळ, हळवे बारीक या जाती तर, हळव्या जातीत रत्नागिरी २४, कर्जत १८४, सोनम इंडम, फुले, राधा या जातींच्या भाताची लागवड केली जाते. हळव्या जातीचे भात पीक ९० ते १०० दिवसांत तयार होते. त्याला पाणी कमी लागते. तर गरव्या जातीचे भात १०० ते १२० दिवसांत तयार होते. त्याला पाणी अधिक प्रमाणात लागते. तालुक्यात इंद्रायणी जातीच्या तांदळाला सर्वाधिक मागणी असून, भोर तालुक्यात ८० ते ९० टक्के इंद्रायणीची सर्वाधिक लागवड केली जाते.
आधुनिक पद्धतीने गादी वाफ्यावर भाताच्या बियाणांची रोपवाटिका तयार करावी. त्यानंतर यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड करा. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत असल्याचे प्रगतिशील शेतकरी भोर पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.