उदापूर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील माळशेज पट्ट्यातील तळेरान, मढ, सांगनोरे, कोल्हेवाडी, खिरेश्वर, खुबी, पिंपळगाव जोगा, कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे या परिसरातील भात झोडणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. आदिवासी शेतकरी भात झोडणी करून साळीला उन्हामध्ये ताप देत आहेत. तर काही शेतकरी कापणी केलेल्या भात शेतीमध्ये आपल्या सर्जा-राजाच्या साथीने मशागत करून दुसऱ्या पिकासाठी शेती तयार करीत आहेत.
माळशेज पट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणून भात पिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पिकावरच संपूर्ण वर्षाचे अर्थकारण, तसेच रोजीरोटीचा सवाल आदिवासी शेतकऱ्यांचा असतो. पावसाळा सुरू झाल्यापासून रोपे तयार करणे, भात लावणे, कापणी, झोडणी, साळी उन्हामध्ये तापवून त्याचा तांदूळ तयार करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणे अशा अनेक प्रक्रिया करीत खूप काबाडकष्ट घेऊन दोन पैशांची अपेक्षा ठेवतात; परंतु नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे तांदूळ या मुख्य पिकाला चांगलाच फटका बसल्यामुळे आदिवासी शेतकरी देखील हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे.
आदिवासी भागात इंद्रायणी, कोलम, वाय.एस.आर. अशा विविध जातींचे भातपीक घेतले जाते. सध्या तांदळाला ५० ते ६० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे; परंतु जेव्हा पावसाची गरज होती तेव्हा पाऊस पडला नाही आणि कापणीच्या वेळेला मात्र अवकाळीने कहर केला. यामुळे उत्पन्नात तर घट झालीच शिवाय तांदूळही काळा पडला. त्यामुळे यावर्षी उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्याची खूप मोठी हानी झाली आहे. थोडाफार तांदूळ पदरी पडला; परंतु तोदेखील काळा असल्यामुळे मनासारखे बाजार भाव तर सोडूनच द्या; परंतु तांदळाला मागणी देखील कमी झाली आहे.
- संतोष मोरे, भात उत्पादक शेतकरी, सांगनोरे.