पुणो : ज्येष्ठ लेखिका आणि निवेदिका पद्मजा फाटक (वय 71) यांचे शनिवारी सकाळी साडेसात वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर 1992 मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्या किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांना न्यूमोनिया झाला होता. यातच त्यांचे निधन झाले. आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
सन 197क्-8क्च्या दशकात त्यांनी दूरदर्शनवर सुंदर माझं घर, शरदाचं चांदणं याद्वारे निवेदिका म्हणून काम केले होते. आपल्या किडनी विकारावर ‘हसरी किडनी’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते. याशिवाय गर्भश्रीमंतीचं झाड, सोनेलूमियर अशी पुस्तकेही त्यांनी लिहिली. ‘गर्भश्रीमंतीचं झाड’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल होता. वामयशोभा, स्त्री मासिकातून त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचे चरित्रही त्यांनी लिहिले होते. नुकतेच त्यांनी ‘रत्नांचे झाड’ हे पुस्तक लिहिले असून, 15 दिवसांत त्याचे प्रकाशन होणार आहे. ‘बापलेकी’ हे पुस्तकही त्यांनी संपादित केले आहे. (प्रतिनिधी)