पुणे : मी आयुष्यात काही कमावले नाही. नोकरी नाही, सॉरी पप्पा, मला जगण्याचा काही अधिकार नाही, मी आत्महत्या करीत आहे, अशी फेसबुकवर पोस्ट टाकून मोबाइल बंद करून आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर एक तरुणी पडली. या तरुणीचा महिला साहाय्य कक्षातील दामिनी पथकाने काही तासांत शोध घेऊन तिचे समुपदेशन केले. आत्महत्येपासून या तरुणीला परावृत्त करून आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांना फेसबुकवर एक ३० वर्षांच्या तरुणीची पोस्ट आली होती. त्यात तिने आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी ही बाब तातडीने महिला साहाय्य कक्षाला कळविली. सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे व महिला पोलीस शिपाई रासकर यांनी तिची माहिती घेतली. त्या मुलीचा मोबाइल बंद होता. तांत्रिक विश्लेषणावरून दामिनी मार्शलांनी तिच्या घराचा पत्ता शोधून काढला. आई-वडिलांकडे चौकशी केली तर त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. ती नेहमीप्रमाणे बाहेर गेली होती. आपली मुलगी आत्महत्या करायला घराच्या बाहेर पडल्याचे समजल्यावर या वयाेवृद्ध दाम्पत्याला धक्काच बसला. मोबाइल बंद करण्यापूर्वी तिने कोणाकोणाला काॅल केला होता, याची माहिती पोलिसांनी काढली. त्यात एका मित्राची माहिती मिळाली. त्याला ती मोबाइल देण्यासाठी आली होती. दामिनी पथकाने तातडीने परिसरात शोध घेतल्यावर कोथरूड येथे ती एका ठिकाणी बसलेली आढळून आली.
-----------------------------
समुपदेशन करून सुखरूप घरी
तरुणीचा शोध लागल्यानंतर दामिनी पथकाने तिला कोथरूड पोलीस ठाण्यात आणले. तिच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केली. नोकरी नसल्याने नैराश्य आले होते. आपल्याला लग्नाचा अधिकार नाही, असे वाटून आत्महत्या करीत असल्याचे पोस्ट फेसबुकला टाकली होती. सुजाता शानमे यांनी तिचे समुपदेशन केले. आईवडिलांना बोलावून तिला त्यांच्या स्वाधीन केले. आईवडिलांनी दामिनी पथकाचे आभार मानले. एका पोस्टमुळे आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला वाचविण्यात पोलिसांना यश आले.
----------------
पोस्ट लगेच केली डिलिट, पण झाली व्हायरल
संबंधित तरुणीने फेसबुकवर आत्महत्येची पाेस्ट टाकली. त्यानंतर तिने ती डिलिट पण केली. पण त्या दरम्यान ती पोस्ट खूप व्हायरल झाली. त्यामुळे तरुणीच्या फेसबुक फ्रेंड असणाऱ्या सर्वांना तिच्या त्या पोस्टबाबत विचारणा झाली. तिला वाचवा, पोलिसांना कळवा, तिला कोणीतरी समजावून सांगा, अशा आशयाचे मेसेज पोस्टनंतर फिरत होते.