पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पुणे शहरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
आज पहाटे या दोघांचे पार्थिव पुण्यात त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. कर्वेनगर परिसरात शेकडो नागरिक, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. या पार्श्वभूमीवर संतोष जगदाळे यांच्या मुलीचा, लेक आसावरीचा एक भावनिक आणि धक्कादायक निर्णय समोर आला आहे. वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आसावरीने घेतली. तिने अंतिम विधी पार पाडला आहे.
विशेष म्हणजे, या दुर्दैवी घटनेच्या साक्षीदार असलेल्या आसावरीच्या कपड्यांवर अजूनही रक्ताचे डाग दिसून येत आहेत. ती मानसिक धक्क्यातून सावरलेली नाही. हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अनेक नागरिकांनी तिच्या धैर्याचे कौतुक केले आहे. तर दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.. अशी मागणी केली आहे. पुन्हा एकदा दहशतवादाच्या क्रूर चेहऱ्याने निर्दोष पर्यटकांचे प्राण घेतल्याने, देशात संतापाची लाट उसळली आहे. सरकारने यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.कुटुंबियांनी सांगितले की, "हल्ल्यानंतर वेळेवर मदत मिळाली नाही. आरोग्य सेवा आणि सुरक्षा यंत्रणा पुरेशा नसल्यामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला. हा गंभीर मुद्दा आपण संसदेत मांडावा." हा दहशतवादी हल्ला केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही, तर देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे..