लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची वर्गातील हजेरी तपासण्याची मोहीम घेऊनही शहरातील काही महाविद्यालयांनी खासगी क्लासशी असलेला छुपा करार कायम ठेवला आहे. शिक्षण विभागाला ठेंगा दाखवत या महाविद्यालयांकडून करारासाठीची अतिरिक्त रक्कम घेऊन विद्यार्थ्यांना उपस्थितीत सवलत देण्याचे आमिष दाखविले जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांसह काही गोष्टी ‘अॅडजस्ट’ केल्या जात असल्याचेही समोर आले आहे.पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीची आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविली जाते. अद्याप ही प्रक्रिया सुरू झाली नसली, तरी महाविद्यालये व खासगी क्लास यांचे छुपे करार अंतिम झाले आहेत. आयआयटी, जेईई किंवा इतर प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ठराविक क्लासमध्ये प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना करार झालेल्या महाविद्यालयांमध्ये उपस्थितीसाठी सवलत दिली जात आहे. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहराच्या मध्य भागातील एक कनिष्ठ महाविद्यालय व खासगी क्लासमध्ये जाऊन स्टिंग आॅपरेशन केले. तेथील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीतून ही दुकानदारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.विभागीय उपसंचालक कार्यालयाने अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासण्यासाठी मागील वर्षी विशेष मोहीम सुरू केली होती. त्यानुसार काही पथके तयार करून त्यांच्यामार्फत ही तपासणीही करण्यात आली होती. या वेळी काही महाविद्यायांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी प्रमाणात आढळून आली; पण त्यानंतर ही मोहीम थंडावली. त्यामुळे महाविद्यालयांनी या तपासणीकडे काणाडोळा करून क्लासशी असलेला करार सुरूच ठेवला आहे.‘अॅडजस्टमेंट’साठी जादा शुल्कएका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशाची माहिती घेत असताना तेथील प्रतिनिधीने कराराची रक्कम सांगितली. विद्यार्थ्यांना उपस्थितीत सवलत दिली जात असल्याने इतर शुल्काव्यतिरिक्त १० हजार रुपये अधिकचे द्यावे लागतील. हे करार शुल्क असते. काही गोष्टी पुढे-मागे ‘अॅडजस्ट’ कराव्या लागतात... सरकारी अधिकारी वगैरे. त्याची कसलीही पावती मिळणार नाही. तसेच इयत्ता बारावीसाठीही हा करार कायम असल्याने पुढील वर्षी तेवढीच रक्कम द्यावे लागेल, असे महाविद्यालयात सांगण्यात आले.महाविद्यालयांमध्ये वाढशिक्षण विभागाच्या मोहिमेनंतर असे छुपे करार बंद होणे अपेक्षित होते. उलट, खासगी क्लासनी आणखी नवीन महाविद्यालये आपल्याशी जोडल्याचे समोर आले आहे. या क्लासच्या शहरात विविध ठिकाणी शाखा आहेत. या शाखांच्या जवळपासच्या एक ते दोन महाविद्यालयांशी करार करण्यात आला आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेला अद्याप अवधी असल्याने आणखी काही महाविद्यालयांशी करार करण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे क्लासमधील महिला प्रतिनिधीने सांगितले.७५ टक्के उपस्थिती बंधनकारकविद्यार्थ्यांना वर्गामध्ये किमान ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. या करारानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये केवळ प्रात्यक्षिके व परीक्षांसाठी हजर राहावे लागते. वर्गातील हजेरी लावण्याचे सोपस्कर महाविद्यायांकडून पार पाडले जाते.अनुदानितमध्येही सवलतक्लासशी करार झालेल्या महाविद्यालयांतील काही तुकड्या अनुदानितही आहेत. या तुकड्यांमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरही विद्यार्थ्यांना उपस्थितीमध्ये सवलत दिली जाणार आहे. तसेच, त्यासाठी त्यांच्याकडून अधिक शुल्क घेतले जाणार आहे. अनुदानित तुकड्यांसाठी संंबंधित महाविद्यालयांना राज्य शासनाकडूनही लाखो रुपयांचे अनुदानही मिळते. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांकडून शासनाची थेट फसवणूक होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.क्लासपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बससेवापिंपरी-चिंचवडमधील एका महाविद्यालयाकडून पुण्यातील संबंधित क्लासपर्यंत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी क्लास संपल्यानंंतर महाविद्यालयाच्या बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जागेवर येतील. तिथून हे विद्यार्थी केवळ प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात जातील. प्रात्यक्षिकांसाठीही या महाविद्यालयामध्ये महिन्यातून एकदा किंवा दोनदाच जावे लागेल. या दोन दिवसांत महिनाभराची प्रात्यक्षिके घेतली जातील, असे सांगण्यात आले. यावरून संबंधित महाविद्यालय व क्लासमधील कराराची तयारी कोणत्या स्तरापर्यंत गेली आहे, हे स्पष्ट होते.महाविद्यालय फक्त दोन दिवससंबंधित क्लासमध्ये प्रवेश घेतलेला असल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात केवळ एक किंवा दोन दिवसच यावे लागेल. या दोन दिवसांत प्रात्यक्षिके घेतली जातील.तसेच, क्लासमध्ये न घेतलेल्या विषयांची तयारीही या दोन दिवसांतच करून घेतली जाईल. त्यामुळे हे दोन दिवस वर्गात उपस्थित राहावेच लागेल. इतर दिवशी उपस्थितीमध्ये सवलत दिली जाईल, असे महाविद्यालयातील प्रतिनिधीने स्पष्टपणे सांगितले.उपस्थितीचे गणित...विविध सुट्या ग्राह्य धरल्यास इयत्ता अकरावी व बारावीचा कालावधी पाच महिन्यांपेक्षा जास्त नसतो. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये आठवड्यातून दोन दिवस येऊन ३२ ते ४५ दिवस हजेरी असली, तरी ७५ टक्के उपस्थिती भरते. काही गोष्टी ‘अॅडजस्ट’ही केल्या जातात. असे गणित मांडून विद्यार्थ्यांना वर्गात गैरहजर राहण्यासाठी सवलत दिली जात असल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’मधून पुढे आले आहे.प्रवेशा वेळी मार्गदर्शन आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेमध्ये अर्जातील दुसऱ्या भागात महाविद्यालयांचा पसंतीक्रम टाकणे आवश्यक असते. हा पसंतीक्रम टाकताना क्लास व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना ‘खास’ मार्गदर्शनही केले जाणार आहे. क्लासशी संबंधित महाविद्यालयांमध्येच प्रवेश कसा मिळेल, याची पुरेपूर काळजी पसंतीक्रम टाकताना घेतली जाईल. त्यामुळे कटआॅफएवढे गुण असल्यास प्रवेश शंभर टक्के मिळणार, असे आश्वासन दिले.
शिक्षण विभागाला ठेंगा दाखवत गैरहजेरीसाठी ‘सशुल्क’ सवलत
By admin | Published: May 06, 2017 2:48 AM