पुणे : लाकडी दांडा व प्लॅस्टिक पाईपने डोक्यात मारहाण करुन एका पेंटरचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सागर गिरीधर दासमे (वय २७, रा. महादेवनगर, मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मांजरीमधील महादेवनगर येथील गणेश निवास येथे ५ जून रोजी दुपारी २ ते ६ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत सागर याचा भाऊ लखन गिरीधर दासमे (वय २६, रा. बोरकर वस्ती, लोणी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गौरव कारकिले, राजू सोनवणे (रा. महादेवनगर, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर दासमे हा पेटिंगचे काम करत होता. गौरव व राजू हेही पेटिंगचे काम करतात. महादेवनगरमध्येच सागर रहात होता. गौरव कारकिले याच्या घरी त्याचे येणे जाणे होते. सागर रविवारी दुपारी गौरव रहात असलेल्या गणेश निवास येथे गेला होता. गौरव येथे गेल्या दीड वर्षापासून राहत आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याचे घराचे दार नुसते लोटलेले दिसून आले. तेव्हा घरमालकीणने आत जाऊन पाहिले असता तेथे सागर दासमे हा पडलेला आढळून आला. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली हडपसर पोलीस तातडीने तेथे पोहचले.
या घरात राहणारा गौरव व राजू हे दोघेही पसार झाल्याचे आढळून आले. सागर याच्या डोक्यात लाकडी दांडा व प्लॅस्टिक पाईपने मारहाण करुन त्याचा खून केल्याचे दिसून आले आहे. घरातील दोघे जण पसार झाले असल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. या तिघांना दारुचे व्यसन होते. त्यातूनच त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली असावीत. त्यानंतर त्यात सागर याचा खून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोघांना पकडल्यानंतरच नेमका काय प्रकार घडला याची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने अधिक तपास करीत आहेत.