पुणे : काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाला, तरी पाकिस्तान खोड्या करण्याचे थांबवणार नाही. हा देश विश्वास ठेवण्यासारखा नाही, असे मत लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी व्यक्त केले.शब्दसखी तर्फे ‘काश्मीर प्रश्न : समज आणि गैरसमज’ या विषयावर सोमवारी त्यांचे व्याख्यान झाले. पाटणकर म्हणाले, ‘‘काश्मीरचा प्रश्न हा पाकिस्तानसाठी जीवनवाहिनी आहे. पाकिस्तानी जनता एका मुद्द्यावर एकत्र यावी, यासाठी काश्मीर प्रश्नाची निर्मिती पाकिस्तानकडून करण्यात आली. या देशाचा बहुतांश समाज हा जमीनदार असून काश्मिरी भूभाग पाकिस्तानला हवा आहे. काश्मिरी नागरिकांप्रति पाकिस्तानला फारसा कळवळा नाही. काश्मीरच्या पाण्याची त्याला खऱ्या अर्थाने गरज आहे. पाकिस्तानचे सैन्यच हे त्या देशाचे सर्वेसर्वा असून, लोकशाही फक्त नावालाच आहे. त्यांच्या सैन्यावर जास्त खर्च केला जातो. त्यामुळे आपल्यासमोरचा शत्रू हा सक्षम असून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.’’काश्मीरबाबतच्या गैरसमजांबाबत ते म्हणाले, ‘‘काश्मिरी लोक पाकिस्तानधार्जिणे आहेत. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे, असे समजणे अत्यंत चुकीचे आहेत. २००१च्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के काश्मिरी नागरिक भारतासोबत यायला तयार आहेत. तेथील लोकांना शिक्षण हवे आहे, रोजगार हवा आहे. त्यांना भारतातच चांगले आयुष्य हवे आहे. बेरोजगारी व गरिबीमुळे काश्मीरमधील तरुण दहशतवादाकडे वळतात. त्यामुळे काश्मिरी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे.’’ (प्रतिनिधी)
पाकिस्तान विश्वासघातकी देश : विनायक पाटणकर
By admin | Published: November 15, 2016 3:41 AM