पिंपरी : भारतासमोर रणभूमीवर टिकाव धरू शकत नसल्याचे लक्षात आल्याने पाकिस्तानने सोशल मीडियाचा वापर करून नवनवे डावपेच आखल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. पाकिस्तानातील काही गटांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपचा प्रकार झाल्याचेही उघडकीस आले आहे. अशाच पद्धतीने व्हिडीओ कॉल करून महिला तसेच तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार होत असून, यातून फसवणुकीची शक्यता आहे.पिंपरी येथील एका महिलेला व्हॉटसअपवरून एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. पाकिस्तानातील +९२ या सिरीजने सुरू होणारा हा क्रमांक असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी संबंधित क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर अशाच अनोळखी क्रमांकावरून पुन्हा व्हिडीओ कॉल आला. तसेच त्या क्रमांकावरून चॅटिंग सुरू झाले. आप शादीशुदा हो या नही, असे काही प्रश्न चॅटिंगदरम्यान विचारण्यात आले. मात्र संबंधित महिलेने त्याला प्रतिसाद न देता पुन्हा त्या क्रमांकाला ब्लॉक केले. संबंधित महिलेच्या पतीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. लॉकडाऊन असल्याने प्रत्यक्ष पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदविणे शक्य नसल्याने ऑनलाइन तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाच्या अधिकाºयांनी देखील संबंधित महिला व त्यांच्या पतीशी संपर्क साधला आहे. माझ्या पत्नीकडे असलेल्या फोनवर अनोळखी व्हॉटसअप व्हिडीओ कॉल आला. संबंधित व्यक्तीने काही मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून माझ्या पत्नीचे नाव शोधले. तिच्या नावाचा चॅटिंगमध्ये उल्लेख केला. त्यामुळे आम्ही ते सर्व क्रमांक लागलीच ब्लॉक केले. मात्र यापुढेही त्यांच्याकडून असा प्रकार होण्याची शक्यता वाटते. याबाबत पोलिसांना संपर्क साधला आहे, असे संबंधित पीडित महिलेच्या पतीने सांगितले.
कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेले त्यातही आंतरराष्ट्रीय कोड असलेल्या क्रमांकाचे कॉल शक्यतो घेऊ नयेत. कोणत्याही संशयास्पद क्रमांकावरून कॉल आल्यास १९६३ किंवा १८००११०४२० या क्रमांकावर रिपोर्ट करावे. स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यासाठी आपल्या मोबाइलमधील डू नॉट डिस्टर्ब (डीएनडी) अॅक्टिव्हेट करावे. आपली वैयक्तिक माहिती अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर किंवा व्यक्तिला देऊ नये. - सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड