पुणे : अमेरिकेने पाकिस्तानला एफ १६ ही विमाने तालिबान हल्ल्यापासून स्वसंरक्षणार्थ दिली होती. ही अट पाळली नाही तर ही विमाने परत घेऊ अशी शर्थ अमेरिकेने घातली होती. पण पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. ही विमाने परत घेण्याची भाषा आता अमेरिका करू लागली आहे, या दबावामुळे पाकिस्तान अभिनंदनला परत देण्यास तयार झाला आहे, असा दावा कर्नल (निवृत्त) अरविंद जोगळेकर यांनी केला आहे. श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) मुंबई, इतिहास प्रेमी मंडळ आणि पुणे मराठी ग्रंथालय अभ्यासिका विभागातर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ५० वर्षांपासूनचे सहकारी प्रतापराव टिपरे यांना पेशवा मोरोपंत पिंगळे जीवनगौरव पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले. मानचिन्ह, ११ हजार १११ रुपये, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. तसेच केंद्र सरकारतर्फे पद्मविभूषण सन्मान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान त्यांच्या सून चित्रलेखा पुरंदरे यांनी स्विकारला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लेफ्टनंट कर्नल सतीश वैद्य (निवृत्त), शिवाजी ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉ.हेमंतराजे गायकवाड, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्र.के.घाणेकर, पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष धनंजय बर्वे, श्रीनिवास वीरकर, मनोहर ओक आदी उपस्थित होते. जोगळेकर म्हणाले, एखादा जवान जेव्हा विमानामधून पॅराशूटने खाली उतरतो तेव्हा सर्वप्रथम तो स्वत:ची सुटका करून घेतो. पायलट अभिनंदन हा पँराशूटने खाली उतरला तेव्हा त्याने पहिला प्रश्न विचारला की मी हिंदुस्थानात आहे की पाकिस्तानात? जेव्हा पाकिस्तानात आहे असे कळले तेव्हा त्याला जवळच पाण्याचे डबके दिसले. त्याने त्याच्याजवळची सर्व डॉक्यूमेंट नष्ट केली. ही खरी देशसेवा आहे. आपल्याला सैन्याबद्दल खरेच प्रेम दाखवायचे असेल, तर दररोज सायंकाळी पुण्यातून झेलम एक्सप्रेस जाते. त्यामध्ये शेवटचा डबा सैनिकांचा असतो. त्या डब्यात सैनिकांना पुस्तके जरुर द्या. सियाचीनमध्ये वर आकाश आणि खाली बर्फ असतो. त्यावेळी वाचन हाच सैनिकांचा साथी असतो. अशा पद्धतीने पुणेकर आपले देशप्रेम दाखवू शकतात, असे त्यांनी सांगितले.डॉ. हेमंत गायकवाड, प्र.के.घाणेकर, प्रतापराव टिपरे यांनी मनोगत व्यक्त केले. सुधीर इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर ओक यांनी आभार मानले.
पाकिस्तानने एफ १६ विमानासंदर्भातील अटीचा केला भंग : कर्नल अरविंद जोगळेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 1:03 PM
' ही 'अट पाळली नाही तर ही विमाने परत घेऊ अशी शर्थ अमेरिकेने घातली होती...
ठळक मुद्देएफ १६ अमेरिकेने तालिबानी हल्ल्यांपासूनच्या संरक्षणासाठी दिली होती