पुणे : पाकिस्तानी नागरिकांच्या डीएनएमध्येच भारतद्वेष असून, तेथील राजकारणी आणि लष्कर देखील द्वेष वाढविण्यावच भर देत आहेत. भारतद्वेषावर राजकारण टिकून असल्याची त्यांची भावना आहे. तेथील सत्ताधाऱ्यांची अशी मानसिकता बदलल्याशिवाय भारत-पाकिस्तान चांगल्या संबंधाबाबत आश्वासक वातावरण निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन पाकिस्तानातील घडामोडींचे अभ्यासक माजी सनदी अधिकारी तिलक देवाशर यांनी सोमवारी येथे केले. अराईज अॅण्ड अवेक आणि महावीर जैन हॉस्टेलच्या वतीने बीएमसीसी महाविद्यालया जवळील जैन हॉस्टेलच्या प्रांगणात देवाशर यांचे ‘भारत-पाक संबंध’ या विषयावर व्याख्यान झाले. महावीर जैन हॉस्टेलचे सचिव युवराज शहा, डॉ. अशोक विखे-पाटील, अराईज अॅण्ड अवेकचे संस्थापक सचिन इटकर उपस्थित होते. देवाशर म्हणाले, ‘‘गेल्या सत्तर वर्षांपासून भारत पाकिस्तानशी एका चांगल्या शेजाऱ्याप्रमाणे राहायचा प्रयत्न करीत आहे. या दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी शंभरावर बैठका झाल्या असतील. मात्र, दोन देशांमधील संबंध सुधारण्या ऐवजी आणखी बिघडत आहेत. याला कारण म्हणजे तेथील लष्कर आणि राजकारणी देखील भारतविरोधी प्रतिमाच जनमाणसात तयार करीत आहेत. ही वृत्ती त्यांनी सोडून दिली पाहिजे. कधी काश्मीर प्रश्नावरुन, तर कधी सिंधु खोऱ्यातील पाणी वाटपावरुन भारताला लक्ष्य केले जाते. काहीवेळा लष्कराच्या तर कधी दहशतवाद्यांच्या माध्यमातून कुरापती केल्या जातात.’’ (प्रतिनिधी)
पाकिस्तानच्या डीएनएतच भारतद्वेष
By admin | Published: April 25, 2017 4:07 AM