दर वर्षी पळशी येथे गुढीपाडवा हा सण हनुमान मंदिर परिसरात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. याठिकाणी पाडवा वाचन केले जाते. हे पाडवा वाचन यावर्षी हनुमान देवाचे पुजारी बाळासाहेब पोरे यांनी केले. या चालू वर्षात काय होणार, काय होणार नाही याची भाकणूक अर्थात भविष्यवाणी वर्तवली जाते. सर्व गावकरी हे ऐकण्यासाठी व गावच्या यात्रेच्या नियोजनासाठी दर वर्षी येथे एकत्र जमतात. परंतु गेल्यावर्षी तसेच यंदाही कोरोनाची परिस्थिती अत्यंत भीषण असल्याने व शासनाने कडक निर्बंध केले असल्यामुळे यंदाही यात्रेतील सर्व कार्यक्रम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह, हनुमान जयंती, दंडवत, देवाचा छबिना, तमाशा, कुस्त्या हे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पळशीचे सरपंच बाबासाहेब चोरमले यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रा दरम्यानच्या काळात भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच चोरमले यांनी केले आहे.
पळशीत पाडव्यादिवशीही हनुमान मंदिरात असलेला शुकशुकाट.
१५०४२०२१-बारामती-०८