किवळे (पुणे) : संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या चिंचोली येथील शनी मंदिर व पादुका मंदिर या पहिल्या विसाव्याच्या ठिकाणासह लष्कराच्या अशोकनगर येथील वसाहतीलगतच्या चौकापर्यंत लावण्यात आलेल्या साडेतीनशेहून अधिक झाडांची काळजीपूर्वक जोपासना करण्यात आल्याने चिंचोली -अशोकनगर परिसरात पालखी मार्ग हरित होत चालला आहे.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूगावातून मार्गस्थ झाल्यानंतर चिंचोली येथील पादुका मंदिर परिसरात पहिला विसावा असतो. या ठिकाणासह चिंचोली गावाच्या परिसरात व लष्करी भागात सर्वत्र वारकरी विसावा घेत असतात. पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी व भाविक दुपारचे भोजन येथे घेत असतात. चिचोली व किन्हई या गावांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करीत असतात. विविध लष्करी आस्थापनांच्या वतीने वारकर्यांसाठी फराळ व नित्योपयोगी वस्तूंचे वाटप करण्यासाठी अन्नदान कक्ष या भागात उभारण्यात येत असतात.
पालखी सोहळा या ठिकाणी दोन तास थांबत असल्याने काही भाविक भोजन झाल्यावर या ठिकाणी माळरानावर आराम करतात. मात्र चिंचोली शनिमंदिर ते अशोकनगर भागात झाडांची संख्या खूप कमी होती. या झाडांना सुरुवातीला टँकरच्या सहायाने पाणी देण्यात येत होते. झाडांना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहकार्यातून पाण्याची व्यवस्था केली असल्याने झाडाना पुरेसे पाणी मिळत असून झाडे अधिक जोमात वाढत आहेत.
प्रतिष्ठानचे सर्व सभासद सामाजिक जाणिवेच्या भावनेतून नियमित झाडाची देखभाल करीत होते. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डासह चिंचोलीतील ग्रामस्थ व युवक झाडांची जोपासना करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. येत्या काळात चिंचोली-देहूरोड लष्करी भागात तुकोबारायांच्या पालखी मार्गावरून ये-जा करणाऱ्या वारकरी, भाविकांसह सर्व वाटसरुंना सावलीचा आधार मिळणार आहे.