सासवड - अवघड असा दिवे घाट सर केल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी सायंकाळी सासवडला पोहोचली. हरिनामाच्या घोषात कीर्तन भजनात दंग होऊन नाचणाऱ्या वैष्णवांना ताकद माऊलींच्या नामाची होती. ३५ किलोमीटरचा प्रवास, त्यात ७ किलोमीटरचा दिवे घाट; मात्र वैष्णव टाळमृदंगाच्या ठेक्यावर घाट चढून आले. सासवडच्या सुसज्ज पालखीतळावर माऊलींची पालखी विसावली, तर पालखीतळाच्या सभोवताली अनेक दिंड्या विसावल्या. दिंड्यांची संख्या गेल्या काही वर्षांत खूप वाढली आहे. गावाबाहेर, पालखीमार्गावर मागेपुढे असणाºया गावांत अनेक दिंड्या व वारकरी विसावले आहेत.संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या दर्शनासाठी पुरंदर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते. दिवसभर पावसाची रिमझिम होती. आज बारस असल्याने उपवास सोडण्यासाठी अनेक वैष्णवांची लगबग सुरू होती. अनेक राहुट्या तसेच तंबंूतून स्वयंपाकाची जोरदार तयारी होती. दुपारी उपवास सोडल्यानंतर अनेक ठिकाणी नामसंकीर्तनाचा गजर होत होता. पालखी सोहळ्यात अनेक नामवंत कीर्तनकार पायी येत असतात. त्यांत प्रामुख्याने बाबामहाराज सातारकर दिंडी, हभप वासकरमहाराज दिंडी या नामवंत दिंड्यांबरोबरच अनेक जण कीर्तनसेवा करीत असतात.मंगळवारी (दि. १०) पहाटे साडेचार वाजता सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्या हस्ते माऊलीस अभिषेक करण्यात आला. नगर परिषदेच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात येत होते. सासवड मुक्कामी माऊलींच्या भक्तांनी सोपानकाका महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. ‘निवृत्ती- ज्ञानदेव- सोपान- मुक्ताबाई, एकनाथ- नामदेव- तुकाराम’चा घोष सुरू होता. सकाळी ही रांग लांबवर पोहोचली होती.वाघिरे हायस्कूलच्या मैदानावर एलसीडी स्क्रीन लावून वै. हभप जनार्दन स्वामी महाराज बाणेरकर दिंडीने आधुनिक पद्धतीचा वापर करून कीर्तनसेवा केली. तर, संत ज्ञानेश्वरमहाराज पालखीतळावर सायंकाळी ६ चा हरिजागर झाल्यानंतर राजुरीकर फड यांच्या वतीने पालखीतळावर कीर्तनसेवा करण्यात आली. लहान मुलांचे आकर्षण असलेली खेळणी, पाळणे तसेच महिलावर्गाचा पालखीत येणाºया काठवट, लाकडी पोळपाट-लाटणे, डाव तसेच लोखंडी तवे खरेदी करण्यावर भर होता.
अवघी सासवडनगरी झाली माऊलीमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 3:05 AM