पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दाेन्ही पालखी मार्गांचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले असून, काही ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न कायम आहे. हा प्रश्नही लवकर सुटून येत्या डिसेंबरअखेर दोन्ही पालखी मार्गांचे पूर्ण होऊन नवीन वर्षात त्यांचे उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. गडकरी यांनी या दोन्ही मार्गांच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. हवाई पाहणी वेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २३५ किलोमीटरचा असून त्याचे सहा टप्पे आहेत. यासाठी आठ हजार कोटींचा खर्च येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे काम करत आहे. त्यातील पाच टप्प्यांचे काम सुरू झाले आहे. सहावा टप्पा हडपसर ते दिवे घाट असून, हा रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे. त्यासाठी महापालिका व राज्य सरकारशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यात येईल. या टप्प्याच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध झाली असून, भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मोहोळ ते वाखरी या टप्प्यासाठी दीड हजार कोटींचा खर्च येणार असून, हे काम ९१ टक्के पूर्ण झाले आहे. तर वाखरी ते खुडूस टप्प्याचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. कुडूस ते धर्मपुरी हे १२०० कोटींचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. धर्मपुरी ते लोणंद हे काम केवळ ४८ टक्के तर लोणंद ते दिवे घाट हे १८०० कोटींचे काम २० टक्केच झाले आहे.’
संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी तीन टप्पे
तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३७ किलोमीटरचा असून, याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. यासाठी पाच हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे. यातील देहू ते हडपसर हा मार्ग दोन्ही महापालिकांच्या हद्दीतून जात आहे. हा शहरी मार्ग असल्याने तो सुधारण्याबाबत महापालिका व राज्य सरकारशी चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट करून हडपसर ते कासुर्डी हा राष्ट्रीय महामार्ग ६५ असून, हा मार्ग चारवरून सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे. पालखी मार्गात पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर व इंदापूर ते तोंडले बोंडसे अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे. त्यातील पाटस ते बारामती टप्प्याचे काम ८५ टक्के, बारामती ते इंदापूर ४४ तर इंदापूर ते तोंडले बोंडले टप्प्याचे काम ४१ टक्के पूर्ण झाले असून, येत्या तीन महिन्यांत या दोन्ही मार्गाचे बहुतांश काम पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. या दोन्ही मार्गांवर सुमारे १९ हजार झाडे लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय कासुर्डी ते पाटस हा मार्गही चार पदरी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, याचा पालखी मार्गात समावेश केलेला नाही.
जीएसटी माफ करावा
पुण्यासाठी सुमारे ५३ हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली असून, त्यासाठी राज्य सरकारने स्टील व सिमेंटवरील जीएसटीत सूट द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच उजनी धरणातून वाळू उपशास परवानगी दिल्यास रस्त्यांच्या कामात त्याचा वापर करता येईल. यामुळे उजनीच्या खोलीकरणाचे कामही होईल, असे ते म्हणाले.