पुणे : पालखीमार्गाची इत्थंभूत माहिती वाहनचालकांना देण्यासाठी वाहतूक शाखेने खास वेबपेज तयार केले आहे़. या वेबपेजच्या माध्यमातून तीन दिवस पालखीचे अपडेट मिळू शकणार आहेत़. शहरातील वाहतुकीसाठी खुले असणारे रस्ते, बंद असणारे रस्ते, पालखीची मार्गक्रमणा, विसावा आदींबाबतची माहिती वाहनचालकांना मिळणार आहे़. त्याचबरोबर या वेबपेजवर इच्छितस्थळी जाण्यासाठीच्या मार्गाचीही माहिती दिली जाणार आहे. वाहतूक शाखेने तयार केलेल्या वेबपेजचे नाव ‘https://changebhai.in/palkhi2019 असे नाव आहे. शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवारी (२६ जून) होणार आहे. पालख्यांचे आगमन पुणे शहरात होताच पोलिसांचे वेबपेज कार्यान्वित होणार आहे. शहरातून पालख्या शुक्रवारी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. पालख्या मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांचे वेबपेज कार्यान्वित राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नियोजन) अरविंद कळसकर याप्रसंगी उपस्थित होते. पालखीच्या आगमनानंतर वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते, वाहनचालकांना वापरता येणारे रस्ते, पालखीचा मार्ग, प्रमुख चौकात पोचण्यास लागणारा अपेक्षित वेळ, विसाव्याचे ठिकाण याबाबतची माहिती या वेबपेजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
वर्तुळाकार वाहतूक योजनामुंबई, नगर, सोलापूर मार्गाने शहरात येणाऱ्या तसेच बाहेर जाणाऱ्या वाहनचालकांसाठी वर्तुळाकार वाहतूक योजना सुरू करण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांनी शक्यतो पुढील चार दिवस मध्यभागातील रस्त्यांचा वापर करणे टाळावा. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.