लोकमत न्यूज नेटवर्कबाणेर : बाणेरमधील ड्रेनेज व्यवस्था कालबाह्य... नालेसफाई अर्धवट... पॅनकार्ड क्लब रस्त्यावर मातीचे ढिगारे, ही बातमी दैनिक लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने याची तातडीने दखल घेत नालेसफाईला सुरुवात केली व पॅनकार्ड क्लब रस्त्यालगत असलेले मातीचे ढिगारे हटवत रस्ता मोकळा केला व अर्धवट ड्रेनेजचे कामही सुरु केले.लोकमतने या परिसरातील समस्यांवर ३० व ३१ मे रोजी प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत गुरुवारी (दि. १) सकाळी १० च्या सुमारास महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी पॅनकार्ड क्लब रस्त्याला भेट देऊन बाणेर व बालेवाडी परिसरातील नालेसफाईची सर्व कामे ही ठरलेल्या वेळापत्रकानुसार व योग्य प्रकारे पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधित सहायक उपायुक्त, संबंधित खातेप्रमुख व संबंधित अधिकारी यांना दिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. जुने ड्रेनेज, अर्धवट बांधकाम झालेले ड्रेनेजचे पाईप, पाण्याच्या जुन्या पाइपलाइनसोबत रस्त्यालगत असलेला राडारोडा, मातीचे ढिगारे, कचरा, अर्धवट स्थितीतील पदपथ, कचऱ्याने तुडुंब भरलेले नाले, रस्त्यांची दुर्दशा, वाकलेले विजेचे खांब, स्ट्रीट लाईटचा पत्ता नाही आदी समस्यांमुळे नागरिक प्रचंड त्रासले होते. या संदर्भात लोकमतने बुधवार (दि. ३१) मे रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत युद्धपातळीवर कामास सुरुवात केली. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी दैनिक लोकमतचे आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक बाबूराव चांदेरे, अमोल बालवडकर, सहायक आयुक्त संदीप कदम, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी उपस्थित होते.आयुक्तांनी दिल्या सूचनावरकरणी नाल्यांची सफाई समाधानकारक असल्याचे दिसून येत असले तरी नाल्यांमध्ये राडारोडा तसेच घाणीचे साम्राज्य होते. तर, काही ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. हे चित्र पाहून आयुक्त कुणाल कुमार यांनी नाराजी व्यक्त करत नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांना बोलावून घ्या आणि त्यांच्याकडून तातडीने नाल्यांची सफाई करून घ्या, असे आदेश या वेळी अधिकाऱ्यांना दिले.स्मार्ट सिटी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत बाणेर, बालेवाडी क्षेत्रनिहाय विकासासाठी समावेश झाला असल्याने या भागातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकासकामे दर्जेदार व्हावीत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या त्या ठिकाणी अतिरिक्त यंत्रणा राबवून काम पूर्ण करा, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या असून बाणेर, बालेवाडी भागातील नालेसफाई पावसाळ्याआधी पूर्ण होईल.- मुक्ता टिळक, महापौरप्रभाग क्रमांक ९ मध्ये डोंगराळ भाग जास्त असल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नालेसफाई कामासाठी निधी वाढवून मिळावा. नाल्यामध्ये असलेल्या ड्रेनेजलाईन शिफ्ट करून घ्याव्यात. यासाठी निधीची तरतूद कॉमन बजेटमधून केली जावी.- बाबूराव चांदेरे, नगरसेवकंंमहापौर व आयुक्त यांनी गरज असलेल्या भागात नालेसफाई पाहणी दौरा केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राम नदीत पाषाण, बाणेर परिसरातील विविध नाल्यातून मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी बाणेर, बालेवाडी परिसरात नाला गार्डन उभारणे, सांडपाण्यावर वाढणारी झाडे लावून नागरिकांना फिरायला पदपथांची निर्मिती करणे यासाठी विशेष आराखडा मी महापौर व आयुक्तांकडे सादर करणार आहे.- अमोल बालवडकर, नगरसेवक
पॅनकार्ड क्लब रस्ता झाला मोकळा
By admin | Published: June 02, 2017 2:42 AM