पुणे : रेकी करुन बंद असलेली घरे टारगेट करुन घरफोडी करणारा आंतरराज्य हायफाय चोरटा पंचाक्षरी स्वामी व त्याच्या टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.पंचाक्षरी संगय्या स्वामी (वय ३५, रा. हिलपार्क अपार्टमेंट, मोदी, सोलापूर), नरेश विष्णु अच्च्युटगटला (वय ३३, रा. मुरारजी पेठ, सोलापूर), अंगद वाल्मिकी बंडगर (वय ३०, रा. गंगानगर, सोलापूर), शावरसिद्ध भरत पुजारी (वय ३५, रा. कुमठा नाका, सोलापूर) आणि कल्याणप्पा मलप्पा इंडी (रा. पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील अंमलदार संपत भोसले व प्रफुल्ल मोरे यांना माहिती मिळाली होती की, मुंजाबावस्ती येथे तिघे जण संशयितरीत्या थांबले असून, ते घरफोडीच्या तयारी आहेत. पोलिसांनी दोन पथके तयार करून तिघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून कटावणी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लहु सातपुते, पोलिस हवालदार दिपक चव्हाण, यशंवत कर्वे, कर्मचारी संपत भोसले, प्रफुल्ल मोरे, संदिप देवकाते, शेखर खराडे यांच्या पथकाने केली.
विमानाने फिरणारा स्वामी
पंचाक्षरी स्वामी हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वी मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद पोलिसांनी वेळोवेळी पकडले आहे. घरफोडी करण्यासाठी तो मुंबईहून विमानाने हैदराबादला जात असे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत दीडशेहून अधिक गुन्हे दाखल आहेत. नरेश याच्यावर देखील वीस ते बावीस गुन्हे दाखल आहेत. तर बंडगर याच्यावर मुंबई येथे आठ गुन्हे दाखल आहेत. तिघे ही सराईत घरफोडे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुजारी हा देखील मुळचा सोलापूर येथील आहे. तो कर्वेनगर येथे मेस चालवतो. चोरी घरफोडी करण्यासाठी टोळी पुण्यात आल्यानंतर त्यांची सर्व व्यवस्था तो करत असे. घरफोडीत मिळालेले दागिने तिघे पुजारीकडे ठेवत असत, पुढे पुजारी ते दागिने सोलापूर येथील सराफ इंडी याच्याकडे देत होते.