भोर : पांडे (ता. भोर) येथील विठ्ठल देवस्थान जमीन इनाम वर्ग ३ गट नं. ८३ मधील ७ हेक्टर ५४ आर जमिनीची भोरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न देता फेरफारची नोंद केली आहे. सदरची बेकायदेशीर नोंद रद्द करावी म्हणून पांडे ग्रामस्थांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि निवेदन देण्यात आले.
आज दुपारी एक वाजता पांडे येथील ग्रामस्थांनी हातात बॅनर, पोस्टर घेऊन महसूल प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत एसटी स्थानकावरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे भूविकास बँकेचे माजी संचालक दिलीप बाठे, रणजित शिवतरे, सरपंच आशा बोंद्रे व मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पांडे. (ता. भोर) येथील विठ्ठल देवस्थान जमीन इनाम वर्ग ३ गट नं. ८३, क्षेत्र ७ हेक्टर ५४ आर जमीन देवस्थानाची असून तिचा भोगवटावगर ३ यामध्ये येत आहे. जमिनीचे इनाम पत्रक १९५२मध्ये विठ्ठल देवस्थान निरंतर अशी नोंद आहे. सदरची नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ७५ अन्वये तालुका रजिस्ट्रारला आहे. परंतु, कालांतराने या जमिनीला कौशल्या गुरव असे नाव इतर हक्कात लागले आहे. म्हणजेच जमीन वंशपरंपरेने वारसा हा गुरव कुटुंबाकडे राहू शकतो. तर, जमिनीचे इनाम पत्रक अधिकार अभिलेखात नोंदीमध्ये कब्जेदार सदरी विठ्ठल देवस्थान निरंतर अशी नोंद आहे. गाव नमुना हक्काचे पत्रक ६ नुसार २८/३/१९८९ प्रमाणे तलाठी सजा दफ्तरी कब्जेदार विठ्ठल देवस्थान असून नोंद आहे. गाव नमुना १ (क) ७ देवस्थान जमीन इनाम तलाठी कार्यालय पुस्तक दफ्तरी विठ्ठल देवस्थान निरंतर अशी नोंद आहे.धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यकया जमिनीला कौशल्या गुरव यांचे मृत्यूमध्ये शंकास्पद असलेली माहिती दिली आहे व मृत्यूनंतर सतीश शिवराम मांडके यांचे इतर हक्कात वारस नाव लावले आहे. त्यानंतर कालांतराने इतर नोंदी लावल्या आहेत. सदर जमिनीची धर्मादाय आयुक्त पुणे येथे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने जमिनीची विक्री करताना धर्मादाय आयुक्त पुणे व विभागीय आयुक्त पुणे यांची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही भोरच्या तहसीलदारांनी ११/९/२०१८ रोजी राज्यमंत्री जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ग्रामस्थांना कुठलीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न देताच बेकायदेशीर नोंद केली आहे.सदरच्या जमिनीची कल्पना विलास मांडके व इतर ९ जणांच्या नावाने बेकायदेशीर नोंद रद्द करावी म्हणून पांडे गावातील ग्रामस्थांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.